पुण्यात धान्य काळाबाजार करणा-या दुकानदारांचे परवाने रद्द, ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 09:12 PM2017-12-21T21:12:16+5:302017-12-21T21:12:34+5:30
पुणे : गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून त्याचा काळाबाजार करणा-या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले असून मागील महिन्यात तीन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले होते.
पिंपरीमधील परवानाधारक बी. एम. भिलारे यांच्या दुकानामध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ५२.२७ क्विंटल तांदळाचा साठा कमी आढळून आला.त्यांना बाजार भावाप्रमाणे ३० रुपये प्रती किलोदराने सुमारे एक लाख ५६ हजार ८१० रुपयांचा दंड करण्यात आला. त्यांची अनामत रक्कम सरकारजमा करण्यात आली आहे. तर दुस-या प्रकरणात पी. पी. भोसले यांच्या नावाने परवाना आहे. त्यांच्या नावाने भावेश अगरवाल हा दुकान चालवित होता. त्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा भोसले यांना सादर करता आला नाही. त्यांच्या दुकानामध्ये १४.५२ क्विंटल गहू आणि ८६.३० क्विंटल तांदूळ जास्त आढळून आला. काळाबाजार करण्याच्या हेतूने साठविण्यात आलेल्या या धान्यसाठ्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यांचीही अनामत रक्कम सरकारजमा करण्यात आली आहे.
यापूर्वी अनमोल नारायणदास उणेचा यांना ४४ लाख ३७ हजार ३२० रुपये, सुनीता अशोक अगरवाल यांना १८ लाख १५ हजार रुपये आणि लक्ष्मीबाई श्याम सोनवणे यांना सहा लाख ९९ हजार २०० रुपये दंड करण्यात आला आहे. त्यांचीही अनामत रक्कम जप्त करून परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी आर. बी. पोटे यांनी सांगितले.