पुलाचा कठडा तोडून कॅनॉलमध्ये कोसळली कार, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 10:01 AM2018-08-12T10:01:00+5:302018-08-12T10:05:42+5:30
भरधाव जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून कार कॅनॉलमध्ये पडली. त्यात कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे. फुरसुंगी येथील सोनार पुलावर पहाटे ही घटना घडली.
पुणे : भरधाव जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून कार कॅनॉलमध्ये पडली. त्यात कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे. फुरसुंगी येथील सोनार पुलावर पहाटे ही घटना घडली. नितीन कुंभार असे मृत व्यक्तीचे नाव असून ते लोणी काळभोर येथील एजंल हायस्कुलमध्ये प्रशिक्षक होते.
याबाबत अग्निशामन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील कॅनॉलवरील रस्त्यावरुन काही जण व्यायाम करायला नेहमी येतात. आज सकाळी साडेसहा वाजता तेथील लोकांना सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. त्यांनी खाली वाकून पाण्यात पाहिले, तेव्हा त्यांना कॅनोलमध्ये एक गाडीचा टप तरंगताना दिसला. त्यावेळी तेथील लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली, तोपर्यंत स्थानिक लोकांनी गाडी बाहेर काढली होती. यावेळी नितीन कुंभार हे गाडीत एकटेच होते. याबाबत फुरसुंगी ग्रामस्थ विशाल हरपळे यांनी सांगितले की, सोनार पुलावर काही जण व्यायाम करत असतात. उजाडल्यावर सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना सोनार पुलाचा लोखंडी कठडा तुटलेला दिसला. त्यांनी खाली पाण्यात पाहिले तर त्यांना गाडीचा टप दिसून आला. त्यानंतर गावातील घुमे, पवार या तरुणांनी पाण्यात उतरुन गाडीला दोर बांधला व गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती न आल्याने गावातीलच क्रेन बोलावून तिच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. तोपर्यंत अग्निशामन दलाची गाडी आली होती.
नितीन कुंभार यांची गाडी कधी पाण्यात पडली हे कोणाच्या लक्षात आले नाही, गाडी पुढच्या बाजूने कॅनॉलमध्ये जाऊन पडल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यांनी मागील सीटवर जाऊन तेथून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. मात्र, दरवाजा प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने उघडण्याचा प्रयत्न केल्याने तो उघडू शकला नाही. त्यामुळे आतमध्येच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.