हेलिकॉप्टरचा भाग पडून छताला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:26 AM2017-08-09T04:26:40+5:302017-08-09T04:26:40+5:30
आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताला भगदाड पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/हडपसर : आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताला भगदाड पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. घराच्या पत्र्यावर पडलेली आठ इंचाची लोखंडी वस्तू थेट पोटमाळ्यावर पडून छताला भेदून जात सर्वांत खालच्या खोलीत पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी रामटेकडी झोपडपट्टीवरून एक हेलिकॉप्टर जात होते. या हेलिकॉप्टरमधून हिरव्या रंगाची आणि अर्धगोलाकार आकाराची चपटी लोखंडी वस्तू खाली पडली. प्रचंड वेगात खाली आलेला पाच ते सहा किलोचा हा पत्रा जॉर्ज फ्रान्सिंस यांच्या घराच्या छताच्या पत्र्यावर पडला. हे घर लोड बेअरिंगचे आहे. त्यामुळे छतावर असलेल्या पत्र्याला भगदाड पडले. या भगदाडामधून ही वस्तू थेट सर्वांत खालच्या खोलीमध्ये जाऊन पडली. जोरात आवाज झाल्याने घरातील माणसे बाहेर आली. स्वयंपाकघर असलेल्या या खोलीत सुदैवाने कोणीही नव्हते. स्थानिकांनी लष्कराचे हेलिकॉप्टर असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. हडपसर, मुंढवा या भागातील एमआयडीसी परिसरात बड्या कंपन्या आहेत. यासोबतच लष्कराचा मोठा भाग आहे. येथील काही उद्योजक हेलिकॉप्टरचा नेहमी वापर करतात. तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरचीही वर्दळ असते. त्यामुळे हे हेलिकॉप्टर नेमके कोणाचे होते याबाबत स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास वानवडी पोलिसांनी सुरू केला असून, घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.