पुण्यातील लांडेवाडीत चोरट्याचा महिलेवर पाशवी बलात्कार; सात ठिकाणी केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 06:45 PM2017-12-06T18:45:41+5:302017-12-08T15:07:22+5:30
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अंगणवाडी ४२ मैल वस्तीवर आजारी वृध्देच्या देखभालीसाठी असलेल्या महिलेवर एका चोरट्याने पाशवी बलात्कार केला आहे.
मंचर : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अंगणवाडी ४२ मैल वस्तीवर आजारी वृध्देच्या देखभालीसाठी असलेल्या महिलेवर एका चोरट्याने पाशवी बलात्कार केला आहे. या चोरट्याने महिलेच्या गुप्तांगावर धारदार हत्याराने वार केला. वृध्देला मारहाण करण्यात आली. लांडेवाडी गावात रात्री चोरट्यांनी चार तास धुमाकूळ घालुन सात ठिकाणी चोरी केली. साडे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख अकरा हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लांडेवाडी गावच्या पश्चिमेला असणाऱ्या अंगणवाडी ४२ मैल वस्तीवर उजव्या कालव्यालगत ढेरंगे यांचे घर आहे. येथे ७७ वर्षीय वृध्दा आजारी आहेत. मुंबई येथे मुलाकडे राहुन नुकत्याच रविवारी त्या या घरात राहण्यासाठी आल्या होत्या. या आजीची सुश्रुषा करण्यासाठी घोडेगाव परिसरातील ४५ वर्षीय महिलेला सोबत ठेवण्यात आले होते. मुलगी शोभा खानदेशे ही रात्री आजीला भेटुन तिच्या घरी गेली होती. वृध्दा व ती महिला दोघीच घरी होत्या. घराच्या आजूबाजूला वस्ती नाही. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाला लाथ मारून दरवाजा तोडुन तिघेजण घरात आले. त्यांच्या हातात सुऱ्या होत्या.
त्या जाग्याच होत्या. एका चोरट्याने हातातील सुरी उलट्या बाजुने तिच्या डोक्यावर मारली. पोटावर तीन फटके मारले. एक चोरटा आजीच्या शेजारी बसून मानेवर सुरी ठेवुन त्याने अंगावरील दागिने काढुन घेतले. यावेळी सुश्रुषा करणारी महिला शेजारी कोचवर झोपली होती. तिचे तोंड दाबून चोरट्यांनी अंगावरील दागिने काढले. कानातील दागिना काढताना तिला जाग आली. महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे तोंड दाबून ठेवले. आतील साहित्य अस्ताव्यस्त करत रोख एक हजाराची रक्कम, दागिने चोरट्यांनी घेतले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून ते बाहेर आले.
काही वेळाने कडी उघडुन चोरटे पुन्हा घरात आले. एका २२ वर्षीय चोरटा महिलेला ओढत आतल्या खोलीत नेवू लागला. त्यावेळी एका ५० वर्षीय चोरट्याने त्याला गैरकृत्य करण्यापासून रोखले. त्याला लाथ मारली. मात्र तरीही त्या चोरट्याने आत नेवून महिलेवर पाशवी बलात्कार केला. महिलेच्या गुप्तांगावर धारदार हत्याराने वार केला आहे, अशी माहिती वृध्देने दिली आहे.
संबंधित महिला आहे तो ऐवज घ्या, मात्र मला सोडा असा गयावया करत होती. या दरम्यान जिवाच्या भितीने आजीने झोपेचे सोंग घेतले. नंतर चोरटे पुन्हा बाहेर जावुन त्यांनी घराला बाहेरून कडी घातली. उशिरापर्यंत चोरटे बाहेर होते. या चोरट्यांनी टी शर्ट व जिन्सची पॅन्ट घातली होती. त्यांनी तोंडाला मफलर बांधली होती. हिंदी व मराठी ते बोलत होते. घराच्या बाहेरची लाईट त्यांनी बंद केली होती.
सकाळी साडेसहा वाजता आजीने आरडाओरडा केल्यावर भरत आत्माराम ढेरंगे यांनी पळत येवुन घराची बाहेरची कडी काढलीनंतर प्रकार उघडकीस आला. याच वस्तीवरील रघुनाथ ढेरंगे व प्रविण यशवंत ढेरंगे यांचे बंद घराचे दरवाजे तोडुन चोरीचा प्रयत्न केला. मात्र ऐवज चोरीला गेला नाही. संजय अर्जून ढेंरंगे यांचे बंद दार तोडुन घरातील साहित्य त्यांनी शेतात नेवून टाकले. ऐवज चोरीला गेला का हे ढेरंगे आल्यावर समजणार आहे.
लांडेवाडी गावातील काशिनाथ निसाळ यांच्या घराचा दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. पाच तोळे सोन्याचे दागिने व बारा हजार रूपयांचा एवज चोरून नेला आहे. विशेष म्हणजे चोरी होत असताना घरातील सर्वजण झोपलेले होते. इतरांनी आवाज दिल्यावर त्यांना जाग आली. घरात झोपलेला छोटा अतीष पहाटे तीन वाजता उठला होता. त्यानंतर चोरीचा प्रकार घडल्याचे निलेश निसाळ यांनी सांगितले. अशोक निसाळ व एकनाथ निसाळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न चोरटयांनी केला.
पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, पोलीस निरिक्षक प्रकाश धस, दराडे ,सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र मांजरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. विशेष म्हणजे लांडेवाडी गावातील बाळु लांडे यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी रात्री ठोठावला होता. मात्र ते उठले नाही.
मंचर पोलीस ठाण्याचे एस. एम. मांजरे लांडेवाडी गावात गस्त घालत असताना रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान ते गावातुन फिरून गेले होते. मात्र तरीही चोरीचा प्रकार घडला आहे. मारहाण झालेल्या वृद्धेच्या मुलीने या घटनेतील आरोपींचा शोध घेवुन त्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. चोरीच्या घटनेने लांडेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
लांडेवाडी चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केली आहे. ठसे व श्वानपथकाने माग घेतला आहे. लांडेवाडी गावातील खासदार आढळराव पाटील यांचे निवासस्थान, भैरवनाथ पतसंस्था व ग्रामपंचायत कार्यालयावर सीसीटिव्ही कॅमेरे असून ते तपासले जात आहे. भोरवाडी येथे झालेल्या प्रकाराशी आजची घटना साम्य दाखविते. अशा प्रकारचे गुन्हे करणारांचा शोध घेत आहोत. तिन चोरटे असल्याचे तपासात पुढे आले असले तरी त्यांचे इतर साथीदार असण्याची शक्यता आहे. महिलेवर बलात्कार झाला असून गुप्तांगावर धारदार हत्याराने वार केल्याचे सदर महिलेची फिर्याद घेतल्यानंतर स्पष्ट होईल.
- प्रकाश धस, पोलीस निरीक्षक मंचर
क्षणचित्रे :
लांडेवाडी गावात ७ ठिकाणी चोरी पाच बंद घरे फोडली. दोन ठिकाणाहुन एवज लंबवला.
मुंबईला मुलाकडे असणारी वृद्धा रविवारी राहण्यास घरी आली. तिची देखभाल करणाऱ्या महिलेवर एका चोरट्याने बलात्कार केला.
चोरट्यांनी महिलेच्या गुप्तांगावर हत्याराने वार केला. वृध्देला हत्याराचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली.
लांडेवाडी परिसरात पहिल्यांदाच एवढा गंभीर गुन्हा. ग्रामपंचायतीपुढील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यापुढे फ्लेक्स लावल्याने चोरटे नजरेत आले नाही.