युवा दिनानिमित्त एफटीआयआयसमोर उभारली जाणार विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:03 PM2018-01-11T12:03:18+5:302018-01-11T12:06:23+5:30
एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे.
पुणे : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे. रामकृष्ण मिशनचे स्वामी कृपाघानंद, प्रा. गिल बेटमन आणि पॅरिसमधील ला फेमिस येथील ४ विद्यार्थी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटनानंतर एफटीआयआयच्या मुख्य सभागृहात अफसान आणि स्वामी कृपाघानंद उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंदांचे स्मरण करताना राष्ट्रीय युवा दिवस आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे स्मारक पाहण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक भूपेंद्र कँथोला यांनी केले आहे.
प्रतिकृतीमधील स्मारक १४ फूट, दगड ३५ फूट तर पुतळा ७ फूट उंच आहे. स्मारकाची प्रतिकृती उभारण्यासाठी लाकूड, प्लायवूड, प्लास्टर, बांबू, जिप्सम पावडर, थर्माकोल आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. आशुतोष कवीश्वर, प्रसाद थोरात, दिपकन दास, ॠषीकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या टीमने प्रतिकृती पूर्णत्वाला नेली आहे.