सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकलेला नवा आयाम
By admin | Published: May 5, 2017 02:19 AM2017-05-05T02:19:16+5:302017-05-05T02:19:16+5:30
सोशल मीडियामुळे व्यंगचित्रांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अनेक भाषिक माणसे सोशल मीडियावर कार्यरत असतात
पुणे : सोशल मीडियामुळे व्यंगचित्रांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अनेक भाषिक माणसे सोशल मीडियावर कार्यरत असतात. भाषेचे बंधन नसल्यामुळे एखादे व्यंगचित्र अपलोड केले की, ते क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकलेला नवा आयाम प्राप्त झाला आहे, व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन, संलग्न राहून काम केल्यास सोशल मीडियाचा मॉडेल म्हणून उपयोग करून घेता येऊ शकतो, असे मत पुण्यातील व्यंगचित्रकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जागतिक व्यंगचित्रदिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ‘चिंटू’फेम चारुहास पंडित आणि ‘बोलक्या रेषा’ फेम घनश्याम देशमुख यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.
व्यंगचित्रकलेच्या विकासातील टप्पे, सध्याची स्थिती, व्यंगचित्र साक्षरता, सोशल मीडियाचा परिणाम, शालेय स्तरावर व्यंगचित्रकलेची गरज अशा विविध विषयांवर व्यंगचित्रकारांनी संवाद साधला. व्यंगचित्रे केवळ राजकीय स्वरूपाचीच असतात, असा समज सर्वदूर दिसतो; मात्र त्यापलीकडे जाऊन सामाजिक, केवळ विनोदचित्रे, अर्कचित्रे, शृंगारिक, विचारप्रवृत्त करणारी व्यंगचित्रे असे वैविध्य जाणून घेण्याची गरज आहे. सध्या कॉमिक्सची क्रेझ पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकलेला नवा आयाम प्राप्त झाला आहे. पूर्वी केवळ मासिके, वर्तमानपत्रांमध्येच व्यंगचित्रे प्रसिद्ध होत. मोजके लोक संपर्क साधून प्रतिक्रिया कळवत असत. आता
सोशल मीडियामुळे व्यंगचित्र काही क्षणांमध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचते. या व्यासपीठामुळे व्यंगचित्रांसाठी जणू अवकाशच खुले झाले आहे. लाइक, कमेंटच्या रूपात प्रतिक्रियाही समजतात. नवनिर्मिती करताना त्याचा उपयोग होतो. व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन, संलग्न राहून काम केल्यास सोशल मीडियाचा मॉडेल म्हणून उपयोग करून घेता येऊ शकतो.
तेंडुलकर म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात व्यंगचित्रे तपशीलवार स्वरूपात असत. रेषांचा जास्त प्रमाणात उपयोग होत असे. हळहळू व्यंगचित्रांमधील रेषा कमी होऊ लागल्या. अनावश्यक भाग वगळण्यात आला. पूर्वी शब्दांच्या माध्यमातून विनोदनिर्मिती होत असे. हळूहळू शब्द कमी होऊ लागले. विनोद शब्दांतून चित्रांमध्ये उतरला. काळाच्या ओघात व्यंगचित्रांचे स्वरूप आणि तंत्रही बदलले. कलेमागे अभ्यास आणि तपश्चर्या असण्यापेक्षा उत्स्फूर्तता असावी लागते. व्यंगचित्रे हे धारदार शस्त्राप्रमाणे वापरायला हवे. त्याची धार बोथट होऊन चालत नाही.’
प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैैली वेगवेगळी असते. आयुष्याचा अनुभव, प्रवृत्ती, विचार त्याच्या व्यंगचित्रांमधून डोकावत असतात. चित्रकला आणि व्यंगचित्रकलेचे माध्यम, साहित्य समान असले तरी कलेची दिशा पूर्णपणे वेगवेगळी असते. उत्स्फूर्तता असेल तर व्यंगचित्रांच्या प्रांतात मुक्तविहार करता येतो. व्यंगचित्र हेही साहित्यच आहे. मुळात कलेची विभागणी करताच येत नाही.’
चारुहास पंडित म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये व्यंगचित्रांचा समावेश व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील संमेलनाच्या वेळी प्रयत्न करण्यात आला होता; मात्र तांत्रिक अडचणींमुळे शक्य झाले नाही. व्यंगचित्रकला हे बोलके साहित्य असल्यामुळे साहित्य संमेलनांमध्ये व्यंगचित्रांना स्थान मिळायला हरकत नाही. व्यंगचित्रकार हा चांगला अभिनेताही असावा लागतो. सध्याची परिस्थिती संवेदनशील असल्याने व्यंगचित्रांमधून व्यक्त होताना पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारीही असावी लागते. समाजात अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली नाही. ही साक्षरता वाढवण्यासाठी शालेय पातळीपासून प्रयत्न होणे गरजेचे आहे; मात्र शासनाचे शैैक्षणिक धोरण नेमके उलट्या दिशेने चालले आहे. अनेक शाळांमध्ये चित्रकला या विषयासाठी शिक्षकही उपलब्ध नाहीत. शासनातर्फे कलेच्या माध्यमातून ठोस धोरण राबवले जाण्याची आवश्यकता आहे. व्यंगचित्रे हे व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे. संवादाचे माध्यम म्हणून शालेय वयापासून व्यंगचित्रकलेचे संस्कार झाल्यास कलेच्या प्रांतात देशाची प्रगती होऊ शकेल; अन्यथा सौैंदर्यदृष्टी नसलेल्या इमारती उभारण्याचेच काम होत राहील.’
व्यंगचित्र साक्षरता वाढवल्यास व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होऊ शकतो. साक्षरता वाढवण्यासाठी आणि उदयोन्मुख व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कार्टुनिस्ट कम्बाइन’ संस्थेच्या माध्यमातून वर्षभर कार्यशाळा, शिबिरे, प्रदर्शने असे विविध उपक्रम राबविले जातात.’
‘व्यंगचित्रकला प्रतिक्रियेतून जन्माला आली. त्यामुळे या कलेला आक्रमकता चिकटलेली आहे. विध्वंस हा कोणत्याही कलेचा उद्देश नसतो. त्यामुळे ही कला काळजीपूर्वक हाताळावी लागते. कलेच्या प्रांतातील दलित, अशी व्यंगचित्रकारांची अवस्था झाली आहे. सध्या समाजातील धार्मिक, राजकीय, जातीय असहिष्णुता वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत व्यंगचित्रे चितारणे जोखमीचे काम बनले आहे.
- मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार
‘व्यंगचित्रकार हा चांगला अभिनेताही असावा लागतो. तो मोजक्या रेषांमधून पात्रांच्या देहबोली व्यक्त करीत असतो. व्यंगचित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतींमध्ये परावर्तित होत असते. सध्याची परिस्थिती संवेदनशील असल्याने व्यंगचित्रांमधून व्यक्त होताना पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारीही असावी लागते. तो प्रत्येक व्यंगचित्रकाराच्या तत्त्वाचा, धिराचा प्रश्न असतो.
- चारुहास पंडित, व्यंगचित्रकार
‘सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यंगचित्रकलेचा रियाझ करता येतो; मात्र व्यंगचित्रांचा गैैरवापर होण्याचीही भीती असते. त्यामुळे या मीडियाचा वापर विचारपूर्वक करावा लागतो. कोणतेही पात्र रंगवताना व्यंगचित्रकार त्याचा बारकाईने अभ्यास करीत असतो. कमीत कमी रेषांमध्ये प्रभावी पात्र उभे राहावे, हाच त्याचा प्रयत्न असतो.
- घनश्याम देशमुख, व्यंगचित्रकार