Pune News: ...सावधान, शेतातच नव्हे; आता बिबट्या येतोय घरात, जुन्नर तालुक्यात सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:34 AM2024-05-09T11:34:07+5:302024-05-09T11:34:48+5:30

सध्या जुन्नर तालुक्यात मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यामुळे बिबट्या आता शेतात नव्हे, येतोय घरात, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे....

Caution, not only in the field; Now the leopard is coming in the house, in Junnar taluka | Pune News: ...सावधान, शेतातच नव्हे; आता बिबट्या येतोय घरात, जुन्नर तालुक्यात सुळसुळाट

Pune News: ...सावधान, शेतातच नव्हे; आता बिबट्या येतोय घरात, जुन्नर तालुक्यात सुळसुळाट

- महेश घोलप

ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्यात बिबट्याने सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. पूर्वी शेतात बिबट्या नागरिकांवर हल्ला करतो म्हणून शेतकरी रात्री अपरात्री बिबट्याच्या भीतीने शेतात जाणे टाळत असत. मात्र, आता शेतातील बिबट्याचे खाद्य संपल्याने बिबट्या थेट मानवी वस्तीत म्हणजेच घरात येऊ लागला आहे. जुन्नर तालुक्यातील जंगलावर मानवाने अतिक्रमण केल्याने जंगली प्राण्यांना आसरा, खाद्य शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे प्रयाण करण्याची वेळ आली आहे. तसेच, सध्या जुन्नर तालुक्यात मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यामुळे बिबट्या आता शेतात नव्हे, येतोय घरात, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

जुन्नर तालुक्यातील उसाचे क्षेत्र संपल्याने लपण्यासाठी जागा नाही, तसेच परिसरातील भक्ष्य संपल्यामुळे बिबट्याने खाद्य मिळवण्यासाठी आपला मोर्चा मानवी वस्ती, गावाकडे वळवला आहे. सध्या जंगली प्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी शहरी भागातही बिबटे संचार करत असल्याच्या घटना घडत आहेत. बिबट्याने जवळपास महिनाभराच्या अंतराने जुन्नर तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिरूली येथे मेंढपाळाच्या मुलाला हल्ला करून ठार केले, तर बुधवारी (दि. ८) काळवाडी येथे यात्रेनिमित्त मामाच्या गावाला आलेल्या रुद्र महेंद्र फापाळे (रा. बेलापूर, ता. अकोले, जि. अहमदनगर) या ८ वर्षांच्या दोन बालकांचा जीव घेतला आहे. उसाच्या शेतात बसल्याजागी बिबट्यांना लपण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने ऊस लागवड क्षेत्रात हमखास बिबट्याचा वावर वाढत आहे. या अशा सर्व घटनांना जंगलातील माणसांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. आज ग्रामीण भागात महावितरणच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्याना रात्री पिकास पाणी द्यावे लागते. त्यावेळी या रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यास बळी पडावे लागते.

दिवसा ढवळ्या अनेकदा बिबट्याचे दर्शन -

आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, ओतूर, मढ पारगाव, बेल्हा, राजुरी, रोहोकडी, उदापूर, डिंगोरे, आंबेगव्हाण, पाचघर, अहीनवेवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, ओझर या पट्ट्यातील गावांत तसेच पूर्ण तालुक्यात दिवसा ढवळ्या बिबट्याचे अनेकदा दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याचा गावातील परिसरातील वावरही आता नवीन राहिला नाही. अशा अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. बिबट्या वन विभागाच्या हाताला काही लागत नाही. बिबट्या जंगलात आहे तोपर्यंत ठीक, मात्र पुरेसे खाद्य उपलब्ध होत नसल्याने बिबट्या अलीकडे नागरी वस्तीत घुसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यांत ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

खबरदारीबाबत जनजागृतीची गरज -

वनविभागाने बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. उपद्रव असलेल्या गावांमध्ये व शहर परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भात जागरूक करणे आवश्यक आहे. बिबट्यांच्या सवयींचा, जीवन जगण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करून उपाययोजनांची गरज असून त्या त्या परिसरात कायमस्वरूपी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे, ॲन्टी रेबीज लस व इमर्जन्सी उपचारासाठी लागणारी सर्व वैद्यकीय सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे. बिबट्यांना पकडल्यानंतर त्यांना जंगलात सोडून न देता त्यांच्या सुरक्षित अधिवसाची काळजी घेऊन हे बिबटे पुन्हा मानवी वस्त्यांकडे येणार नाहीत यावर कायमचा मार्ग काडून दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: Caution, not only in the field; Now the leopard is coming in the house, in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.