मुलगी झाल्याचे 'कडक' सेलिब्रेशन : हॉटेल मालकाची सर्व ग्राहकांना पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:22 PM2018-08-24T17:22:59+5:302018-08-24T17:23:30+5:30
मुलगी झाली प्रगती झाली असे म्हटले जाते. पण पुण्यातल्या एका उद्योजकाला त्याचा अगदी खराखुरा अनुभव आला आहे.
पुणे : मुलगी झाली प्रगती झाली असे म्हटले जाते. पण पुण्यातल्या एका उद्योजकाला त्याचा अगदी खराखुरा अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले कडक चहा या दुकानाचे संचालक अजित केरुरे यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात येणाऱ्या प्रत्येक विनामूल्य चहा आणि हवे ते पेय तर दिले आहेच शिवाय प्रत्येकाला पेढेही वाटले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी इंजिनिअरिंग डिग्रीला हार घालणाऱ्या उद्योजकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.तो फोटो केरुरे यांचाच असून ही डिग्री फक्त लग्न करताना उपयोगी पडली असे त्याखाली लिहिले होते. त्यामुळे पुणेकरांच्या आकर्षणाचा भाग बनलेले हे दुकान आता अजून एका कारणाने चर्चेत आले आहे. त्याचे कारण असे की, आज अजित यांना मुलगी झाली असून त्यांना चहा, कॉफी आणि इतर कोणतेही पेय पिण्यास येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास विनामूल्य सेवा दिली आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येकाला पेढाही देण्यात येत आहे.
या विषयी अजित यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पहिली बेटी धनाची पेटी' या वाक्याची प्रचिती मला आयुष्यात आली आहे. आज माझ्या आणि पत्नीच्या आयुष्यातला सर्वांचे आनंदाचा दिवस आहे. यातून मला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा नसून मला माझा आनंद सर्वांसोबत वाटायचा होता.आज चहाला येणाऱ्या ग्राहकांनी बाळाला दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहेत असेही ते म्हणाले.