कुरुळी येथे रंगला काळभैरवनाथाचा उत्सव
By admin | Published: April 26, 2017 02:46 AM2017-04-26T02:46:10+5:302017-04-26T02:46:10+5:30
येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव प्रथापरंपरेने विधिवत पूजा, तमाशा व लावण्यांच्या मनोरंजक कार्यक्रम, कुस्त्यांच्या आखाड्याने साजरा करण्यात आला.
कुरुळी : येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव प्रथापरंपरेने विधिवत पूजा, तमाशा व लावण्यांच्या मनोरंजक कार्यक्रम, कुस्त्यांच्या आखाड्याने साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त पहाटे काकडा आरती, अभिषेक महापूजा, हारतुरे, रात्री मनोरंजन तमाशा लावण्याचा भरदार कार्यक्रम पार पडला. रात्री श्री काळभैरवनाथ महाराजांची पालखी फटाक्यांची आतषबाजी, सनई-चौघड्याच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी काळोखे, मा. जि. प. सदस्य शांताराम सोनवणे, सरपंच शरद मुऱ्हे, यात्रा कमिटी अध्यक्ष एम. के. सोनवणे, गुलाब सोनवणे, सुदाम मुऱ्हे, आशिष मुऱ्हे, मल्हारी बागडे, शांताराम घाडगे, रमेश बागडे, रामदास मुऱ्हे, सागर मुऱ्हे, दिलीप ढोले, गुलाब कांबळे, किसन डोंगरे, जितेंद्र कांबळे, दिलीप मेदनकर, यात्रा कमिटी सदस्य, ग्राम सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्ती आखाड्यात पंच म्हणून खेड केसरी दीपक डोंगरे, तानाजी बागडे, शिवाजी मेदनकर, विशाल सोनवणे, वस्ताद गणेश कांबळे यांनी काम पाहिले.
‘कोल्हापूर महापौर केसरी’ किताब मिळविणाऱ्या कुरुळीच्या सुवर्णकन्या पै. तेजल अंकुश सोनवणे व ‘डब्बल बाल केसरी’ दर्शन गणेश कांबळे यांचा कुरुळी यात्रा कमिटीच्या वतीने फेटा, श्रीफल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त मंदिरला आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. आतषबाजीत, गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत पालखी काढण्यात आली.(वार्ताहर)