१० मे रोजी होणार सीईटी ; इंजिनिअरिंग, फार्मसी व अॅग्रिकल्चर पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:45 AM2018-01-19T07:45:21+5:302018-01-19T07:45:29+5:30
इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली
पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून येत्या २५ मार्चपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतील, असे राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आले.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. इंजिनिअरिंग (बीई व बीटेक), फार्मसी (पदविका व पदवी फार्मसी), पदवीस्तरावरील कृषी अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या तारखा यापूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १० मे रोजी ही परीक्षा होईल.
आॅनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश घेत असताना अथवा पडताळणीच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशाची माहिती-पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. ही माहिती-पुस्तिका तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात अथवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर आॅनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन समाईक प्रवेश परीक्षांचे आयुक्त आनंद रायते यांनी केले आहे.
सीईटी अर्जासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये शुल्क, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क असेल.'
परीक्षेचे वेळापत्रक
अर्ज करण्याची मुदत :
१८ जानेवारी ते २५ मार्च
विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : २६ मार्च ते ३१ मार्च
प्रवेशपत्रक वाटप : २५ एप्रिल ते १० मे
सीईटीची परीक्षा : १० मे
सीईटीचा निकाल : ३ जूनपूर्वी किंवा नंतर
माहिती-पुस्तिका तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात अथवा संकेतस्थळावर उपलब्ध