चाकणला प्लास्टिक कंपन्यांंवर छापे, पर्यावरण मंत्र्यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:35 AM2018-10-21T05:35:22+5:302018-10-21T05:35:34+5:30
खराबवाडी (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील आगरवाल पॅकेजिंग कंपनीवर खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी छापा टाकून धडक कारवाई केली.
चाकण (जि. पुणे): खराबवाडी (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील आगरवाल पॅकेजिंग कंपनीवर खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी छापा टाकून धडक कारवाई केली. त्यांनीच स्वत: पोलीस व महसूल यंत्रणेला याबाबत कळविले. त्यानंतर कुरुळी गावच्या हद्दीतील चिंबळी फाटा येथील मिताली पॅकेजिंग या कंपनीवरही अधिकाऱ्यांमार्फत छापा टाकून साहित्य जप्त केले.
पर्यावरणमंत्री कदम हे शनिवारी चाकण-तळेगावमार्गे दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी शिर्डी येथे जात होते. या वेळी खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन पुढे जाताना त्यांना दिसला. त्यांनी टेम्पोचालकाला विचारले असता हा माल एका कंपनीतून आणला असून, तो दुसºया कंपनीत नेत असल्याचे सांगितले. यानंतर कदम यांनी पोलिसांना पाचारण केले. चालकाकडे असलेल्या कागदपत्रांवरून कंपन्यांचे पत्ते मिळाले. या पत्त्यावर कदम यांनी आपला ताफा वळविला. टेम्पोच्या मागे कंपनीत जाऊन आगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. या कंपनीवर छापा मारून थेट कारवाई केली. येथे प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे त्यांना आढळले. या कंपनीत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोदामे भरून कोट्यवधीचा माल आढळला. कंपनीचे अधिकारी हे उत्पादन ५० मायक्रॉनच्या पुढे आहे व त्यावर बंदी नसल्याचे सांगत होते.
कदम यांनी काही अधिकाºयांना चिंबळी फाटा येथील मिताली पॅकेजिंग कंपनीत पाठवून तेथेही कारवाई केली. कदम ४ तास कारवाई होईपर्यंत कंपनीत उपस्थित होते.