शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा बालेवाडीतून जाणारा मार्ग बदलावा; पीएमआरडीएकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:40 PM2018-01-20T12:40:18+5:302018-01-20T12:43:47+5:30
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली.
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली. हा मार्ग बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेर असा करण्यात यावा, असे त्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग बाणेर बालेवाडी गावच्या हद्दीतून तसेच रस्त्यांजवळून जातो. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता फक्त २४ किलोमीटरचा आहे. या रस्त्याची रुंदी वाढवून ३० किलोमीटर करण्यासाठी पुणे महापालिकेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
तसेच, या मार्गावरून मेट्रोची आखणी केली असता भविष्यात या ठिकाणी वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो असे बालवडकर यांनी गित्ते यांना सांगितले. त्यामुळे या २४ किलोमीटर रस्त्याला पर्यायी मार्ग बालेवाडी हायस्ट्रीटचा रस्ता आहे. हा ३० किलोमीटर रुंदीचा रस्ता असून, या ठिकाणी कोणताच अडथळा निर्माण होणार नाही.
त्यामुळे मेट्रोच्या मार्गामध्ये बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेर असा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी बालवडकर यांनी केली.