एका थाळीत दाेघांनी जेवू नका, पुणे विद्यापीठाचे परिपत्रक ; विद्यार्थी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:04 PM2019-04-01T13:04:07+5:302019-04-01T13:07:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीबाबात अनेक तक्रारी असताना विद्यापीठाच्या नवीन परिपत्रकामुळे विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीबाबात अनेक तक्रारी असताना विद्यापीठाच्या नवीन परिपत्रकामुळे विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी रिफक्टरीमध्ये एका थाळीत दाेघांनी जेवू नये या नियमाचे काटेकाेर पालन करण्यात यावे असा आदेश विद्यापीठाकडून काढण्यात आला आहे. याविराेधात विद्यार्थी आवाज उठवत असून विद्यापीठाच्या रिफक्टरीजवळ आंदाेलन करण्यता येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जेवणात अळ्या सापडल्याने विद्यार्थी संतप्त झाले हाेते. त्यावर विद्यार्थ्यांना तीन दिवस जेवणात गाेड पदार्थ देण्याचे रिफेक्टरी चालकाने मान्य केले हाेते. आता विद्यापीठाने एक परिपत्रक काढले असून त्यात अनेक नियम व अटी घातल्या आहेत. जेवणाचा दर्जा राखण्यासाठी काही नियम बनविल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. यात मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांबराेबरच सुमारे तीनशे विद्यार्थी पैसे भरुन जेवणासाठी येत असल्याने रिफेक्टरीवर ताण पडत असल्याचे या परिपत्रकात म्हणण्यात आले आहे. त्याचबराेबर विद्यार्थ्यांनी एका थाळीमध्ये दाेघांनी जेवू नये असे सुद्धा या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक काही विद्यार्थ्यांना घरुन पैसे मिळत नसल्याने तसेच काही विद्यार्थ्यांना एक थाळी संपत नसल्याने अन्न वाया जावू नये म्हणून काही विद्यार्थी एका थाळीत भाेजन करत असतात. परंतु एका थाळीत एकानेच जेवावे हा नियम असून त्याचे काटेकाेर पालन करावे असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
या बराेबरच मासिक पास व्यतिरिक्त जेवणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिफेक्टरी मध्ये न जेवता त्यांच्यासाठी मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह आठ आणि नऊ येथे त्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रिफेक्टरीमधील दुरदर्शन संच काढून तेथे विद्यापीठाचे विद्यावानी केंद्र ऐकता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
दरम्यान या विराेधात आता विद्यार्थी आक्रमक झाले असून रिफेक्टरीजवळ आंदाेलन करण्यता येत आहे.