जिल्हाधिकारी सौरभ राव, अभिनंदन...!
By Admin | Published: October 16, 2014 05:59 AM2014-10-16T05:59:01+5:302014-10-16T05:59:01+5:30
मतदार यादीतून नाव वगळल्याने लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते
पुणे : मतदार यादीतून नाव वगळल्याने लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. तर, मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याने खासदार अनिल शिरोळे यांनी आंदोलन केले होते. मात्र, या चुकांची दुरुस्ती झाल्याने पालेकर व शिरोळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
लोकसभा निवडणुकीत पालकेर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले होते. मतदार यादीतून नाव वगळल्याने पालेकर यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने माहिती घेतली असता पालेकर यांचे मुंबई येथेही घर असून, तेथील मतदार यादीत त्यांचे नाव आढळले. तसेच, मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रभात रस्त्यावरील त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या वॉचमने पालेकर हे मुंबई येथे राहत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पालेकरांचे नाव पुण्यातील मतदार यादीतून वगळले. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पालेकरांचे नाव मतदार यादीत नोंदविले. बुधवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पालेकर यांनी पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)