कातरवेळी उमटले सूरलहरींचे तरंग; नूपुरनाद महोत्सवाचा पुण्यात बहारदार समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:21 PM2018-02-05T12:21:49+5:302018-02-05T12:26:31+5:30
काश्मीर खोऱ्यातील संतूर या तंतुवाद्यावर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी सूरसाज चढवित एका वेगळ्याच भावविश्वाची अनुभूती रसिकांना दिली.
पुणे : काश्मीर खोऱ्यातील संतूर या तंतुवाद्यावर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी सूरसाज चढवित एका वेगळ्याच भावविश्वाची अनुभूती रसिकांना दिली. संतूरच्या छेडलेल्या मंजूळ तारांमधून उमटलेल्या सूरलहरींचे तरंग रसिकमनावर उमटले. आणि रविवारी सायंकाळी ‘नूपुरनाद’ला चार चाँद लागले. प्रसंगी भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नूपुर दैठणकर, निनाद दैठणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
निमित्त होते... भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित आणि कॉटनकिंग प्रस्तुत दोनदिवसीय नूपुरनाद महोत्सवाचे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन व पंडित व्यंकटेशकुमार यांच्या स्वरमैफलीने नूपुरनाद महोत्सवाची सांगता झाली. कोथरूड येथील आयडियल कॉलनीच्या मैदानावर भरलेल्या या महोत्सवात रसिकश्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. पंंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र पंडित राहुल शर्मा मंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पंडित शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडत विविध राग आणि गीते वाजवत श्रोत्यांची वाहवा मिळवली. मध्य लय, द्रुत लय तीनताल... अन् कौशी ध्वनीमधील धून सादर होताना पंडित राहुल शर्मा यांना श्रोत्यांची मिळालेली दाद अवर्णनीय होती. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. दुसऱ्या सत्रात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या सुमधुर गायनाने शांतिरसाची अनुभूती आली. व्यंकटेशकुमार यांनी सादर केलेल्या कल्याण, बिहाग रागात विलंबित अशा अवीट बंदिशींनी अभिजात शास्त्रीय संगीताचा एक एक बंध उलगडत नेत ही मंतरलेली सायंकाळ अवर्णनीय पर्वणी केली. त्यांनी सादर केलेल्या बंदिशींनी आसमंत दुमदुमला. ‘सजनी...,’ ‘मुख मोर मोर...’ या सादरीकरणावर श्रोत्यांनाही ठेका धरायला लावला. आजा सावरिया... ही भैरवी सादर करीत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर शिवराज पाटील व निवृत्ती धाबेकर व हार्मोनियमवर राहुल गोळे यांची साथ लाभली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.
शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असून, यातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडत आहे, असे डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले.