विद्यापीठात तक्रार पेट्यांचा फक्त देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:16 PM2018-04-06T15:16:55+5:302018-04-06T15:16:55+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागांमध्ये बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या केवळ देखाव्यापुरत्याच उरल्या असल्याचे चित्र आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागांमध्ये बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या केवळ देखाव्यापुरत्याच उरल्या असल्याचे चित्र आहे. या पेट्या उघडल्याच जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात लेखी तक्रार या पेटीत टाकली होती. मात्र, ही तक्रार पेटीच कित्येक दिवस ‘बंद पेटी ’ तच राहिली . विद्यापीठातील एका विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थीनीने याबाबत कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. पण त्यापुर्वी तिने विभागातील तक्रार पेटीमध्ये लेखी तक्रार टाकली होती. पण त्यानंतर कित्येक दिवस ही पेटी उघडलीच गेली नाही. त्यामुळे अखेर तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थीनीने थेट कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे संबंधित प्राध्यापकांची तक्रार केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर कुलगुरूंनी संबंधित प्राध्यापक व विभागप्रमुखांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींसाठी विद्यापीठात विशाखा समितीही स्थापन केली आहे. मात्र, या समितीकडे तक्रारीच येत नाहीत. त्यातच आता तक्रार पेट्याही उघडल्या जात नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे विद्यापीठाने देशात मानांकनात आघाडी घेतलेली असताना असे प्रकार उघडकीस येत आहेत.