विवाह सोहळ्यात रूजतीये ‘पौराणिक थीम’ची संकल्पना; परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:02 PM2017-12-01T18:02:07+5:302017-12-01T18:04:22+5:30
आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे.
नम्रता फडणीस
पुणे : ‘थीम वेडिंग’ म्हटले की डोळ्यासमोर येतात ते उंची सेट्स, भरजरी पेहराव आणि नेत्रदिपकता... सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी यांच्या विवाहसोहळ्यात किंवा चित्रपटांमध्ये अशाप्रकारच्या ‘थीम वेडिंग’ ची संकल्पना राबविलेली आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र आता मराठमोळ्या पारंपरिक लग्नसोहळ्यामध्येही ही ‘थीम वेडिंग’ची संकल्पना रूजू लागली आहे. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे. या संकल्पनेमधून आपल्या संस्कृतीमधील एक काव्यमय पान उलगडले जात आहे हे त्यातील वेगळेपण!
कोणताही मराठी माणूस किंवा खरतर प्रत्येक भारतीय व्यक्ती हा उत्सवप्रियच असतो. प्राचीन संस्कृतीमध्ये इतके सौंदर्य आणि वैविध्य दडलेले आहे की त्यातून व्यक्तीला कलात्मक अनुभूती मिळते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक पारंपरिक सोहळ्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कारण त्या सोहळ्यांमधील प्रत्येक विधी आणि संस्काराच्या मागे दडलेला अर्थ त्याला सर्वांगीण समृद्ध करत असतो. प्राचीन संस्कृती आणि संस्काराचे वैभव नव्या पिढीलाही उमगावे या उददेशानेच ‘पौराणिक थीम वेडिंग’ ची संकल्पना विवाहसोहळ्यांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला जातोय. येत्या ४ डिसेंबरला इस्कॉन मंदिरात होणा-या एका मराठमोळ्या कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात ‘कृष्ण रूक्मिणी विवाह’ची पहिलीच मालिका उलगडली जाणार आहे. अभिनय, कला, संगीत, नृत्यक्षेत्रातील अनुभवी कलाकारांच्या सहयोगाने नवनिर्मित संहिता व संगीतनृत्याच्या आधारे पौराणिक संदर्भांसहित विधींचे सादरीकरण हे या सोहळ्याचे वैशिष्ट आहे.
‘उंची सेटस किंवा भव्यदिव्यता म्हणजे ‘थीम’नव्हे. हे त्या गोष्टींचे एकेक भाग आहेत. पौराणिक कथा-मालिकांमध्ये ज्या पद्धतीने विवाहसोहळा झालेला आहे, तशाच पद्धतीची थीम घेऊन आम्ही आगळावेगळ्या सोहळ्याची मुहूर्तमेढ रूजवित आहोत. श्रीराम सीता स्वयंवर, पेशवाई विवाह या अभिजात मालिकेतील अशीच एक ‘कृष्णरूक्मिणी विवाह’ कथा आम्ही विवाहसोहळ्यात सादर करणार आहोत. या मालिकेतला हा पहिला विवाहसोहळा होत आहे. वधू आणि वर दोघेही ‘कृष्ण आणि रूख्मिणीच्या मेकअप आणि पेहरावात येणार आहेत. नृत्य, संगीत, नाट्यमयता अशा विविध कलाप्रकारांनी हा विवाह सोहळा नटणार आहे. या संकल्पनेचा कॉपीराईट मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत
- रमेश पाटणकर, पाटणकर इव्हेंट्स