काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना लिहिली ‘रक्ताळलेली’ ५० पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 04:40 PM2019-02-15T16:40:50+5:302019-02-15T17:13:44+5:30
काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत.
पुणे : काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. या हल्ल्याला मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप पत्रांद्वारे करण्यात आला असून राजीमान्याचीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
पुणे शहर काॅंग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागूल आणि त्यांच्या ४९ कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली आहेत. पुलवामा येथे झालेला हल्ला दुर्दैवी असून त्याला मोदी आणि त्यांच्या सरकारला दोषी धरायला हवे. गेल्या पाच वर्षात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची खुर्ची शहिदांच्या रक्ताने माखली आहे. त्याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत. वारंवार देशाचे सैनिक शहीद होत असताना आपली ५६ इंच छाती कुठे गेली असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी भारतीय लष्कर त्याचा अवश्य बदला घेईलच. आमचा सैन्यदलांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, मोदी आणि भाजपावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मोदींचा राजीनामा हिच सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल असेही या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘प्रिय मोदीजी मन की बात के बदले खून की बात चाहीये’, ‘इंडीया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक’, ‘हमे निंदा चाहिये... और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए’, ‘जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा’, ‘नोटबंदी नको तर दहशतवाद बंदी करा’ अशा अनेक जळजळीत प्रतिक्रिया असलेली ही पत्र आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा ४४ वर जाऊन पोचला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आली असून पाकिस्तानकडून याचा बदला घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येऊ लागल्या आहेत. अनेकांनी केंद्र शासनाला पत्र आणि ईमेल पाठवून आपल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. मात्र, बागूल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे पत्र कुरीअर आणि ईमेलद्वारे मोदींना पाठविण्यात येणार आहेत. ज्या प्रकारे सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय मोदी घेतात तसेच या हल्ल्यामुळे आलेले अपयशही स्विकारले पाहिजे असे बागूल म्हणाले.