कीर्तनकार शेलारमामा सुवर्णपदकासाठी शाकाहाराची अट!: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:00 PM2017-11-10T12:00:28+5:302017-11-10T12:03:14+5:30
पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येणार आहे, त्यासाठी तो विद्यार्थी शाकाहारी व निर्व्यसनी असण्याची अट घालण्यात आली आहे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येणार आहे, त्यासाठी तो विद्यार्थी शाकाहारी व निर्व्यसनी असण्याची अट घालण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खानपानाच्या विविधतेवरून भेदभाव करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परीपत्रकात कीर्तनकार शेलारमामा सुवर्णपदकासाठी अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून थोड्याच वेळात कुलसचिव याबाबत खुलासा करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असेल. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाºया विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.