राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर वादाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:23 PM2018-05-03T12:23:11+5:302018-05-03T12:23:11+5:30
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्या कलाकरांनी घेतला आहे.
पुणे : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे गुरुवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वितरण होणार आहे. मात्र, या पुरस्कार मात्र, सोहळ्यावर वादाचे सावट निर्माण झाले आहे. कारण या पुरस्कार सोहळ्यात व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या हस्ते अकराच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहे.यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या कलेची मोहर उमटविणाऱ्या कलाकारांनी नाराजीचा सूर आळविला आहे.
राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा क्रम असतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्या कलाकरांनी घेतला आहे.
'म्होरक्या'चे दिग्दर्शक अमर देवकर म्हणाले, स्मृती इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास आमचा विरोध नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार असून तो राष्ट्रपतींकडून न दिला जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता, यंदा 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याकडे मान्यवरांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.