सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:33 PM2018-01-03T17:33:44+5:302018-01-03T17:43:09+5:30
ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
पुणे : ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. शहरात शांततेत बंद पाळण्यात आला.
शहरात दिवसभरात १८ बसगाड्या वर दगडफेक, एकूण ७० छोटे-मोठे मोर्चे निघाले. तर भीमा कोरेगावच्या घटनेस कारणीभूत असणाऱ्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी काल केली होती. या प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारिप बहुजन महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा देत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला. काही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दिवसभरात १८ गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले. पीएमपीच्या सरासरी ५० ते ५५ बसेसचे नुकसान झाल्याचे समजते. रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, २१ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर येथील परिसर संवेदनशील असल्याने बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. स्वत: शुक्ला यांनी सकाळी शहरात फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. सायंकाळनंतर ८० टक्के बंदोबस्त कमी करण्यात आला.