देवेन शहा हत्याप्रकरणाचा तपास अखेर गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:15 AM2018-03-28T02:15:10+5:302018-03-28T02:15:10+5:30
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा हत्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ७ आरोपींना
पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा हत्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ७ आरोपींना पकडल्यानंतर व त्यातील एकावर मोक्काअंतर्गत कारवाई झाल्यानंतर आता २ महिन्यांनंतर याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़ या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची त्यांच्या प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटच्या आवारात १३ जानेवारी २०१८ रोजी रात्री हत्या करण्यात आली होती़ सोसायटीतील सीसीटीव्हीवरून पोलिसांनी हत्या करणारा रवींद्र चोरगे याला सर्वप्रथम जळगावहून अटक केली़ त्यानंतर हत्येतील पिस्तुल लपवून ठेवणारा सुरेंद्र पाल याला ठाण्यातून अटक केली होती़ चोरगेचा साथीदार राहुल शिवतारे याला अटक केली होती़ पिस्तुलासाठी पैसे पुरविणारा शंकर नवले (रा़ चंदननगर) याला अटक केली़ पिस्तुल खरेदी करून देणारा शिवतारेचा मित्र सुनील ऊर्फ सोनू मदनलालजी राठोर (रा़ उज्जैन) याला अटक केली होती़ त्यानंतर समीर रजनीकांत सदावर्ते (वय ४२, रा़ कोथरूड) आणि नितीन दशरथ दांगट (वय ३६, रा़ वारजे माळवाडी) यांना नुकतीच अटक करण्यात आली़
देवेन शहा यांची हत्या झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेसह सर्व शाखा तपासात उतरल्या होत्या. डेक्कन पोलिसांनी ६ पथके स्थापन करून आरोपींचा शोध सुरू केला़ त्यानंतर गुन्हे शाखेला संपूर्णपणे बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर हा तपास करण्यात आला़ जळगाव येथे जाऊन रवींद्र चोरगे याला डेक्कन पोलिसांनी अटक केली़ आरोपींपैकी सुनील ऊर्फ सोनू मदनलालजी राठोर याच्याविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या़ राठोर याच्यावर संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून शहरातील बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत़ पोलिसांनी त्याच्यावर मोक्काअंतर्गंत कारवाई केली आहे़ मोक्का कारवाई केल्यानंतर त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ या गुन्ह्याशी संबंधित अनेक बांधकाम व्यावसायिक व जमीन व्यवहारात गुंतलेल्या एंजटांची नावे पुढे येत असल्याचे बोलले जात होते़ त्यांच्यापैकी काही जणांना अटकही होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती़
या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सांगितले, की हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची आॅर्डर मंगळवारी काढण्यात आली आहे़ उद्या गुन्हे शाखा त्याबाबतची सर्व कागदपत्रे आपल्या ताब्यात घेईल़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले, की स्थानिक पातळीवर या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही़ तसेच, पुढील काळात डॉ़ आंबेडकर जयंतीसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे़