काकडी, हिरवी मिरची महागली; कोथिंबीर स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:46 AM2018-02-05T00:46:46+5:302018-02-05T00:46:56+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली.
पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. परिणामी कांद्याच्या दरात किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारात कोथिंबीरची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर घसरले आहेत.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. त्यात परराज्यातून दिल्लीहून १० ट्रक गाजर, कर्नाटकातून ३ ते ४ ट्रक कोबी, बँगलोरहून ८०० पोती आलं, जयपुर १० आणि मध्यप्रदेश येथून ८ ट्रक मटारची आणि कर्नाटक येथून पाच पोती तोतापुरी कैरीची आवक झाली. स्थानिक मालामध्ये सातारी आल्याची १ हजार २०० पोती आणि टोमॅटोची ५.५ ते ६ हजार पेटी, हिरव्या मिरचीची ३ ते ४ टेम्पो, ढोबळ्या मिरचीची ३ ते ४ टेम्पो, शेवग्याची ३ ते ४ टेम्पो, भुईमुग शेंगाची २०० ते २५० पोती, मटारची ३० ते ४० पोती, पावट्याची ५ ते ६ ट्रक, कांद्याची १७५ ट्रक, इंदौर आणि तळेगाव बटाटयाची ७० ट्रक तर मध्यप्रदेश येथून लसणाची ६ ट्रक आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात कोथिंबीरीची आवक वाढली आहे. त्यामुळे मागील आठवड्याचा विचार करता कोथिंंबीरीच्या दरात शेकड्यामागे दोनशे रुपयांची घट झाली आहे. कोथिंबीरीबरोबरच मुळे आणि हरबरा गड्डीच्या दरातही घट झाली आहे. त्याचबरोबर चाकवत, करडई, हरभरा गड्डी आणि मुळ्यामध्ये ५ ते १० टक्क्यांनी दरघट झाली आहे. बाजारात मेथीची आवकही कमी झाली असून तर शेपुच्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
>गुलछडी, झेंडू महागला
गेल्या काही दिवसांपासून थंडी पुन्हा वाढल्याने त्याचा परिणाम गुलछडीच्या फुलांवर झाला आहे. बाजारात गुलछडीच्या फुलांची आवक निम्म्याने घटली असून आवक घटल्याने दरात तब्बल ४० ते ५० टक्कयांनी वाढ झाली आहे. तर झेंडूचे दर ५ ते १० टक्कयांनी वाढले आहेत. मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व फुलांची चांगली आवक झाली. परंतु, मागणी कमी असल्याने फुलांचे दर स्थिर आहेत. थंडी वाढल्यास गुलछडीच्या फुलांची अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे आवक घटून दरात वाढ होत आहे.
> बोरं स्वस्त; डाळींब, पेरू महागले
पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. परंतु, कलिंगडाचा दर्जा खालावलेला असल्याने त्याला अजूनही अपेक्षित मागणी नाही. तर डाळिंबाची आवक वाढली असून मागणीही वाढली आहे.त्यामुळे चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. बोरांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ग्राहकांकडून मागणी कामी होऊ लागली आहे. त्यामुळे बोरांच्या दरातही ५ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे.
दरम्यान, रायपुर येथून पेरुची आवक सुरु झाली असून या पेरुला जास्त मागणी आहे. बाजारात तब्बल दोन टन पेरुची आवक झाली असून पंधरा किलोच्या बॉक्समध्ये पेरु बाजारात दाखल झालेले आहेत.
मात्र, लिंबासह इतर फळांचे दर आवाक्यात आहेत, असे व्यापाºयांनी सांगितले.
रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात अननसाची ६ ट्रक, जुन्या मोसंबीची १६ टन तर नवीन मोसंबीची ३० टन आणि संत्रीची १५ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १५ ते २० टेम्पोे आवक झाली. त्याचप्रमाणे लिंबाची ७ ते ८ हजार गोणी, चिक्कू १० टन, पेरुची दोन टन, रायपुर पेरुची दोन टन, रामफळची ३ टन, खरबुजाची चार टन, कलिंगडाची दहा टन, द्राक्षांची दहा ते बारा टन, गावरान अंजिरची एक टन, स्ट्रॉबेरीची सहा टन, बोरांची दीडशे पोती आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.