पसरतोय सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’; दहा महिन्यात दुप्पटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:16 PM2017-10-30T17:16:12+5:302017-10-30T19:14:10+5:30
विविध प्रकारांमधून पुण्यात सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत असून, यंदाच्या वर्षी नऊच महिन्यात सायबर गुन्हयात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
पुणे : तो बेरोजगार होता. त्याला नोकरीची गरज होती. खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्या तरूणाला मोबाईल आणि ईमेलवरून तिघांनी संपर्क साधला. त्याला दोन लाख रूपये भरायला सांगितले आणि त्याने ते तत्काळ भरले. त्याचा रितसर इंटरव्हू झाला, आॅफर लेटर आले. मात्र जेव्हा त्याने त्या कंपनीमध्ये फोन केला तेव्हा अशा पदावर कोणतीच भरती केली नसल्याचे त्याला सांगण्यात आले आणि आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच त्याने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली....
यांसारख्या विविध प्रकारांमधून पुण्यात सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत असून, यंदाच्या वर्षी नऊच महिन्यात सायबर गुन्हयात जवळपास दुपटीने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये नोकरीची फसवणूक, फेसबुकवर बनावट खाते, बदनामी, आक्षेपार्ह कमेन्ट्स आणि फेसबुक खाते हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.
सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय आणि त्यातून आॅनलाईन व कॅशलेस व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाने अवघे जग आता जवळ आले आहे. आज मोबाईलवरून सरासपणे आॅनलाईन खरेदी विक्री केली जात आहे. नोकरी किंवा अगदी विवाहविषयक संकेतस्थळांवरही आपली माहिती कोणती दक्षता न घेता टाकली जात असल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे. यातच तुम्हाला बक्षिस लागले आहे, तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत असे सांगून डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती मागितल्याबरोबर कुठलीही शहानिशा न करता ती दिली जात असल्याने फसवणुकीमध्ये वाढ होत चालली आहे. तरूणीही आपले फोटो फेसबुकवर टाकत असल्याने त्यांचे फेसबुक खात हँक करून धमकी देणे, बदनामी करणे असे प्रकारही वाढत आहेत. मात्र सायबर गुन्हयांबाबतचे संभाव्य धोके माहिती नसल्याने गुन्हयांच्या संख्येत भर पडत चालली आहे. गेल्यावर्षी सायबर क्राईम सेलकडे १ हजार ३९८ तक्रारी आल्या होत्या. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ३ हजार १२३ तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती सायबर क्राईम सेलकडून देण्यात आली आहे.
गुन्ह्यांचे प्रकार २०१६ २०१७
* कार्डद्वारे मनी ट्रान्सफर ७३८ २३५०
* नोकरी फसवणूक १४५ १९६
* कर्ज फसवणूक ४१ ५४
* विवाहविषयक/फेसबुक मैत्री/गिफ्ट फसवणूक ६६ ७२
* फेसबुक फेक प्रोफाईल/बदनामी २९२ २८३
आक्षेपार्ह कमेंट्स/ओळखेची चोरी ८३ १३४
* फेसबुक प्रोफाईल हॅक आणि आक्षेपार्ह
फोटो
* फेसबुक हँकिंगवरचे शोषण ११ ८
* हँकिंग मेलद्वारे ट्रान्सफर मनी २२ २६
कोणती काळजी घ्याल?
* क्रेडिट व डेबिट कार्डची गोपनीय माहिती देऊ नका.
* मोबाईल, फेसबुक व ई मेलद्वारे अनोळखी लिंक आल्यास उघडू नका.
* नेट बँकिंग किंवा आॅनलाईन व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. कुणासमोर किंवा नेट कॅफेमध्ये हे व्यवहार करू नका.