बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:54 PM2018-02-23T18:54:24+5:302018-02-23T18:54:24+5:30
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून न्यायालयाला अहवाल सादर केला. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डीएसके यांच्या ब्रेनमध्ये ब्लडक्लॉथ असल्याने त्यांची वेळोवेळी एमआरआय चाचणी करण्याची आवश्यकता आहे़ त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केली होती. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य केली होती. मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर आणि ससूनमधील मेडिकल टीमने शुक्रवारी पुन्हा तपासणी करावी. पोलिसांच्या चौकशीच्या दृष्टीने तंदुरुस्त आहेत का याचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे वैद्यकीय पथकाने डीएसके यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने त्यांना आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर पोलिसांनाही हवा ताबा
पुण्याबरोबरच डीएसके यांच्यावर कोल्हापुरातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनाही डीएसके यांचा ताबा हवा आहे. कोल्हापूर पोलिसांनीही डीएसके यांचा ताबा मिळविण्यासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे पावणेतीनशे जणांनी गुंतवणूक केली होती. या प्रकरणी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे ४ हजार पेक्षा जास्त लोकांची सुमारे २८५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.