डंपरची धडक बसून परभणीच्या तरुणाचा मृत्यू
By admin | Published: April 26, 2017 04:09 AM2017-04-26T04:09:04+5:302017-04-26T04:09:04+5:30
परभणीहून पुण्यात रोजगारासाठी आलेल्या एका तरुणाला वाटेतच खडीच्या डंपरची धडक बसून प्राण गमवावे लागले. धायरी गावातील
पुणे : परभणीहून पुण्यात रोजगारासाठी आलेल्या एका तरुणाला वाटेतच खडीच्या डंपरची धडक बसून प्राण गमवावे लागले. धायरी गावातील रायकरमळा येथे २४ तारखेला सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अनिर्बंध पद्धतीने आणि रात्रंदिवस सुरू असलेल्या पाण्याच्या टँकरच्या आणि डंपरच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असताना हा अपघात झाला असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
दीपक संजय साळवे (वय २०, रा. मूळ परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे मामा संतोष रोहिदास परिहार (वय २७, दत्ता रायकर चाळ, काळुबाई मंदिराजवळ, रायकरमळा) यांच्याकडे परभणीहून येत होता. घरी जाताना त्याला खडीने भरलेल्या डंपरची जोरदार धडक बसली. त्यात तो जागीच मरण पावला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरचालक सचिन सुरेश मंजुळकर (किरकटवाडी) याला बेदम चोप दिला. तो जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याने संतोष परिहार यांच्या फिर्यादीवरून मंजुळकर याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरिक्षक जयश्री गडकरी तपास करत आहेत.