दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी’ला मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:58 PM2018-09-26T14:58:06+5:302018-09-26T14:59:16+5:30
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीमंतांपासून गरिबांच्या घरात केरसुणी पुजेसाठी लागतेच. प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते.
पळसदेव : दिवाळी सण मोठा सण असतो. हा सण एक महिन्यावर येऊन ठेपला असल्याने दिवाळीच्या वस्तू बनविण्यासाठी कारागिरांची ‘लगबग’ सुरू आहे. त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व असणारी ‘लक्ष्मी’ (केरसुणी) बनविण्यासाठी कारागिर कामाला लागले आहेत.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीमंतांपासून गरिबांच्या घरात केरसुणी पुजेसाठी लागतेच. प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते. त्यामुळे या लक्ष्मीला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ही केरसुणी बनविण्यासाठी ‘शिंदाड’ झाडाची पाने लागतात. मात्र इंदापूर तालुक्यात ही झाडे नष्ट झाल्याने कारागिर धास्तावले आहेत. मात्र आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळण्यासाठी कारागिर शिंदाड झाडाचे फड (फांद्या) आंध्र प्रदेश राज्यातून आणून ही लक्ष्मी बनवित आहेत. हे फड वाळविणे, त्यानंतर त्याची सफाई करणे, ही कामे प्रथम करावी लागतात. परराज्यातून हे शिंदाडचे फड बंडल स्वरूपात येतात. त्यामधे 20 ते 25 लक्ष्मी होतात.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडीला मोठ्या प्रमाणावर केरसुनी बनविल्या जातात. येथील जवळपास वीस कुटुंब हा व्यवसाय करतात. ही लक्ष्मी बनविण्यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. याबाबत मनिषा शिंदे यांनी सांगितले की, सध्या शिंदाड झाडाचे फड मिळत नसल्याने आम्हाला आंध्र प्रदेशातून फड आणावे लागतात. खर्च मोठ्या प्रमाणात येतो. आमचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे. तर भरत शिंदे यांनी सांगितले की, आधी हाताने ही केरसुणी विचरावी (पातळ करणे) करावी लागत होती. त्यासाठी वेळ लागत होता. मात्र, आता यंत्र उपलब्ध झाल्याने काम गतीमान झाले आहे. त्यामुळे त्रास ही कमी झाला आहे.
दरम्यान येथील लक्ष्मीला राशीन, कर्जत, अकलूज, काष्टी, श्रीगोंदा, बारामती, दौंड, भिगवण, केडगाव, नातेपुते येथील व्यापाऱ्यांची मागणी असते. हे व्यापारी येथून या लक्ष्मी घेऊन जातात.