कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य ; 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 05:26 PM2019-02-26T17:26:02+5:302019-02-26T17:27:16+5:30
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांसोबत 28 फेब्रुवारीला मुंबई येथे बैठक पार पडणार आहे.
पुणे : कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांसोबत 28 फेब्रुवारीला मुंबई येथे बैठक पार पडणार आहे. आज दुपारी 4 च्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सरकारचा निर्णय विध्यार्थ्यांना वाचून दाखवला. विद्यार्थ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे.
कालपासून कर्णबधिर विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत होते. या विध्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण मिळावे, नोकरीत संधी मिळावी इत्यादी प्रमुख मागण्या या विद्यार्थ्यांच्या होत्या. आज सकाळी दिलीप कांबळे यांची समाजकल्याण आयुकांसोबत बैठक पार पडली. दुपारी अधिवेशनात या आंदोलनासंदर्भात निर्णय झाल्या नंतर कांबळे यांनी निर्णय विद्यार्थ्यांना वाचून दाखवला तसेच, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
मान्य करण्यात आलेल्या मागण्या
राज्यातील 5 विभागात मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी उच्च महाविद्यालये सुरु करण्यात आली. नाशिक, लातूर मध्ये महाविद्यालय सुरु करणार.
सामान्य शासकीय शाळांमध्ये सांकेतिक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल.
शासकीय नोकरीसाठी कर्णबधिर उमेदवार पात्र ठरल्यास त्याला संधी देण्यात येईल.
तज्ज्ञांनी मान्यता दिल्यास कर्णबधिर विद्यार्थ्यांना वाहन परवाना देण्यात येईल.
शासकीय नोकरीत मूकबधिर प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या उमेदवाराची बेरा तपासणी कारण्यासंधारबत सामान्य प्रशासन विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागमार्फत परिपत्रक आठ दिवसांच्या आत निर्गमित करण्यात येईल.