संविधान घराघरापर्यंत पोहचविण्याचा निर्धार; पुरोगामी संघटना राबविणार अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:34 PM2017-10-27T15:34:38+5:302017-10-27T15:37:53+5:30
एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, लोकायतसह पुण्यातील विविध पुरोगामी संस्था संघटनांनी संविधान जागर अभियान समिती स्थापन केली आहे. या समितिच्या वतीने संविधान जागर अभियान राबविले जाणार आहे.
पुणे : संविधान घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, लोकायतसह पुण्यातील विविध पुरोगामी संस्था संघटनांनी संविधान जागर अभियान समिती स्थापन केली आहे. या समितिच्या वतीने २६ आॅक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध ठिकाणी संविधान जागर अभियान राबविले जाणार आहे.
भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथून दिनांक २८ आॅक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता संविधान जागर अभियानाला सुरूवात केली जाईल. हे अभियान २६ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहिल. संविधान जागर अभियान समितीमध्ये फुले-शाहु आंबेडकर विचारमंच, शाहीन फ्रेंड सर्कल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, लोकायत, सोशलिस्ट पार्टी (इंडिया), मुस्लीम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, स्वराज अभियान, आजाद कलम के लिए, जनगर्जना मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, संविधान जागर अभियान समिती (आंबेडकर नगर) आदींचा सहभाग राहणार आहे.
संविधान देशासाठीचा मुलभूत कायदा आहे. उद्याच्या भारताबद्दल स्वातंत्र्य चळवळीच्या शहिदांनी आणि नेत्यांनी पाहिलेले महास्वप्न म्हणजे ‘भारतीय संविधान’ आहे. पण आज संविधानाबद्दल, संविधानाने दिलेल्या अधिकारांबद्दल आणि संविधानाने नागरिकांकडुन अपेक्षिलेल्या कर्तव्यांबद्दल बहुसंख्य नागरिकांना फारशी माहिती नाही. या अभियानातून संविधांनाबदद्ल नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.