देवेन शहा हत्या प्रकरण :‘त्यांना’ एन्काऊंटरची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:40 AM2018-01-23T06:40:40+5:302018-01-23T06:41:02+5:30
आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणा-या दोघांपैकी एकाला जळगाव येथून पकडण्यात डेक्कन पोलिसांना यश मिळाले
पुणे : आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणा-या दोघांपैकी एकाला जळगाव येथून पकडण्यात डेक्कन पोलिसांना यश मिळाले असून, आपण एकत्र राहिलो तर ते आपला एन्काऊंटर करतील, अशी भीती वाटत असल्यानेच ते दोघेही वेगळे झाले होते, असे तपासात पुढे आले आहे़
डेक्कन पोलिसांनी रवींद्र सदाशिव चोरगे (वय ४१, रा़ निलपद्म सोसायटी, अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला रविवारी जळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली़ याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी दिली़ रवी चोरगेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने काही माहिती दिली आहे़ देवेन शहा यांच्या बरोबर रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांचा संपर्क होता़ रवी रियल इस्टेटचे काम करतो़ शेतकºयांच्या जमिनी एकत्र करून त्या मोठ्या रियल इस्टेट एजंटांना विकणे व त्यातून कमिशन घेणे, असा त्याचा व्यवसाय होता़ त्यांनी एका नातेवाइकाकडून मोटारसायकल वापरायला घेतली होती़ त्यावरूनच ते घटनास्थळी आले होते़ देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून ते पळून गेले होते़ घटना घडल्यानंतर ते प्रथम भोर येथे गेले़ तेथून महाड, खोपोली, देहूरोड येथे आले़ तेथून ते पुन्हा खोपोलीला गेले़ या दरम्यान त्यांनी मोटारसायकल कोठे तरी टाकून देऊन नंतर ते एसटी बस, लक्झरी बसने फिरू लागले़ खोपोलीहून ते अक्कलकोट व तेथून ठाणे, इंदौर, उज्जैनवरून गेल्या गुरुवारी बºहाणपूर येथे गेले़ तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपू लागले होते़ तेथे त्यांनी ठरविले की, आपण एकत्र राहिलो तर पकडले जाऊ व पोलीस आपला एन्काऊंटर करतील़ त्यामुळे तेथून ते वेगळे झाले़ रवी चोरगे तेथून जळगावला आला व केपी हॉटेलमध्ये राहू लागला़ याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, सतीश सोनावणे, पांडुरंग जगताप आणि पोलीस नाईक पांचाळ यांचे पथक तातडीने जळगावला रवाना झाले़ त्यांनी रवीला रविवारी ताब्यात घेऊन पुण्यात आणले़
गुन्ह्यामागे मुख्य सूत्रधार कोण?
डेक्कन पोलिसांनी रवी चोरगे याला सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ एम़ गुळवे पाटील यांच्या न्यायालयात हजर केले़ सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने पिस्टल व राऊंड कोणाकडून प्राप्त केले आहे, त्याची काय विल्हेवाट लावली याचा तपास करून ते जप्त करायचे आहे़ या गुन्ह्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास करणे जरुरीचे आहे़
आरोपीच्या मदतीने त्याचा साथीदार राहुल चंद्रकांत शिवतारे याचा शोध घेऊन अटक करायची आहे़ गुन्ह्याच्या वेळी वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे, यासाठी त्याची पोलीस कोठडी घ्यावी, अशी मागणी केली़ न्यायालयाने ती मान्य करून रवी चोरगे याला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़
1 रवी व राहुल दोघांकडे हत्यारे होती़ त्यांनी ती कोठेतरी टाकून दिली आहेत़ त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे अजून स्पष्ट झाले नाही़ सर्व गोष्टी रवीला माहिती आहेच असे नाही़
2 इंदौर येथील राजेश अग्रवाल हेही रियल इस्टेटचे काम करतात़ त्यांचा देवेन शहा यांच्याशी संपर्क होता का, याची माहिती अजून मिळालेली नाही़ रवी चोरगे याचे अंडरवर्ल्डशी काही कनेक्शन आहेत, याची माहिती अद्याप पुढे आली नाही़ त्याची चौकशी केली जाईल, असे उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांनी सांगितले़