पुणे, शिरूरमधील चारही उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटिसा जारी, खुलासा मागविला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:44 AM2024-05-09T10:44:07+5:302024-05-09T10:45:05+5:30

मोहोळ यांच्या दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३ लाख सहा हजार ४७४ इतका खर्च दाखविण्यात आला आहे...

Difference in expenditure of all four candidates in Pune, Shirur; Notices issued, clarification sought | पुणे, शिरूरमधील चारही उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटिसा जारी, खुलासा मागविला

पुणे, शिरूरमधील चारही उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटिसा जारी, खुलासा मागविला

पुणे :पुणे आणि शिरूरलोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराला केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. खर्च सादर करण्याच्या दुसऱ्या फेरीत पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात तफावत आढळली आहे. त्यानुसार त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.

मोहोळ यांच्या दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३ लाख सहा हजार ४७४ इतका खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, निवडणूक खर्चाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरमधील खर्चाचा अहवाल तपासला असता दुसऱ्या टप्प्यात ४९ लाख ३४ हजार ५८ रुपयांचा खर्च झाल्याची नोंद आढळली. त्यामुळे ३६ लाख २७ हजार ५८४ रुपयांच्या खर्चाची तफावत आढळली आहे. त्यामुळे मोहोळ यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात ११ लाख ६७ हजार ७०९ रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे त्यांनाही नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे लोकसभा मतदारसंघातील अन्य चार उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या शॅडो रजिस्टरनुसार ५३ लाख ३८ हजार ३३४ रुपयांचा खर्च झाला असून प्रत्यक्षात २२ लाख ९१ हजार ५४८ रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे ३० लाख ४६ हजार ७८६ रुपयांचा खर्चाची तफावत आढळली आहे. त्याशिवाय डॉ. अमोल कोल्हे यांनी ४३ लाख ९६ हजार ४२६ रुपयांचा खर्च झालेला असताना त्यापैकी केवळ ३२ लाख १८ हजार ९६८ इतका खर्च दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात ११ लाख ७७ हजार ४५८ रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे कोल्हे, आढळराव या दोघांनाही नोटिसा देण्यात येऊन खुलासा मागण्यात आला आहे. शिरूर मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे यांच्यासह एकूण सहा जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Difference in expenditure of all four candidates in Pune, Shirur; Notices issued, clarification sought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.