अवघड जागेचं दुखणं.! बसथांब्यांच्या नुकसानीने पीएमपीएल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:32 PM2019-05-20T14:32:49+5:302019-05-20T14:39:35+5:30
पीएमपीएलचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व परिसर असे मिळून सुमारे ४ हजार बसथांबे आहेत.
पुणे : पीएमपीएल या सार्वजनिक प्रवासी सेवेच्या बसथांब्यांच्या वाढत्या नुकसानीने प्रशासन हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळेस मुक्काम म्हणून या थांब्यांचा वापर करणाऱ्यांकडून तिथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड तसेच चोऱ्याही होत आहेत. आधीच प्रायोजक मिळेनात व थांबेही सांभाळता येईनात अशा दुहेरी अडचणीत प्रशासन सापडले आहे.
पीएमपीएलचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व परिसर असे मिळून सुमारे ४ हजार बसथांबे आहेत. त्यातील साधारण दीड हजार बस शेड आहेत, तर अन्य थांबे म्हणजे एका खांबावर पिवळी पाटी लावून बस थांबण्यासाठी केलेली जागा आहे. महापालिकेच्या जागेत या शेड बांधण्यात येतात. तिथे प्रवाशांची बसण्याची व्यवस्था व शेड म्हणजे उन किंवा पावसापासून बचाव असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तशी स्थिती नाही.
गर्दीच्या रस्त्यांवरचे बसथांबेही मोडकळीस आलेले आहेत. बाकडे तुटलेले, बसता येत नाही, शेडवरचे छत उडालेले अशी अनेक थांब्यांची अवस्था आहे. पीएमपीएल मध्ये थांब्यांचे व्यवस्थापन स्थापत्य, जाहिरात, वाहतूक अशा विभागांकडून पाहिले जाते. गर्दीच्या रस्त्यांवर असलेल्या थांब्यांकरता जाहिरातदारांकडून जाहिरात लावली जाते, थांब्यांची दुरूस्ती मात्र टाळली जाते. जाहिरातीचे उत्पन्न थांब्यांच्या दुरूस्तीकरता वळवणे शक्य असूनही व्यवस्थापनाकडून तसे केले जात नाही.
काही मार्गावरील गाड्या रात्री बारापर्यत व काही गाड्या रात्रभर सुरू असतात. त्या मार्गांवरील थांब्यांवर दिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना अंधारात थांबावे लागते. वेळापत्रक वगैरे नाही पण बसण्यासाठी व्यवस्थित बाकडे व दिवे असावेत असे त्यांचे म्हणणे आहे.
...........
उत्पन्नाकडेच लक्ष
पीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठी आहे यावर कंपनीच्या अध्यक्षांपासून ते शिपायापर्यंत कोणाचाच विश्वास नाही. जाहाराती, लोकप्रतिनिधींचा विकासनिधी यातून थांबे तयार केले जातात, मात्र त्यात कसलीही कल्पकता तसेच प्रवाशांच्या उपयुक्ततेचा विचार केलेला नसतो. जाहिरात कशी करता येईल याला मात्र प्राधान्य दिलेले असते. थांबे उपयुक्त तर हवेतच तसेच आकर्षकही हवेत.
-जुगल राठी, पीएमपीपीएल प्रवासी मंच