ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीची नोकरानेच केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:01 AM2018-02-10T01:01:36+5:302018-02-10T22:13:29+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली.
पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. मात्र, हा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा उलगडा झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.
कोल्हटकर ( रा. मिताली को. आॅप. सोसायटी, गुळवणी महाराज रस्ता, एरंडवणे) हे पत्नी दीपाली आणि सासूसह रहात होते. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असून, मुलगी आणि जावई पुण्यामध्ये राहतात. तीन वर्षांपासून कोल्हटकर आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची मुलगी रोज दुपारी घरी येऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून जात असे. त्यांची देखभाल करण्यासाठी दोन नोकर आहेत.
गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास घरामधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरडा करत घराकडे धाव घेतली. त्यावेळी स्वयंपाक घरात दीपाली या जळालेल्या अवस्थेत दिसल्या.
शुक्रवारी शवविच्छेन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दीपाली यांच्या डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याच्या शक्यतेने खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी दिली.