चर्चेत अडकला मेट्रो प्रकल्प
By admin | Published: December 27, 2014 05:06 AM2014-12-27T05:06:34+5:302014-12-27T05:06:34+5:30
तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले.
पुणे : तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले. खासदार अनिल शिरोळे यांनी ही रेल्वे भुयारी की जमिनीवरून होणार, जुन्या डी.पी.आर.मध्ये (सविस्तर प्रकल्प अहवाल) कोणत्या चुका आहेत, याबाबत संदिग्ध उत्तरे दिली आणि स्वस्त व चांगली मेट्रो पुणेकरांना देऊ असेही सांगितले.
संसदेत पुण्यातील प्रश्नांविषयी उपस्थित केलेल्या बाबींची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. आमदार मेधा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
शिरोळे म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सदोष असून, मध्य पुण्यात तसेच भुयारी मार्ग करण्याच्या खर्चात गेल्या काही वर्षांत झालेली लक्षणीय घट विचारात घेतलेली नाही. पुणेकरांसाठी गैरसोयीची रचना अंगीकारली गेली आहे. या बाबींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’
यूपीए सरकारने फेब्रुवारीमध्ये पाठविलेल्या पत्रातील महत्त्वाच्या मुद्दांचाही विचार झालेला नाही, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी बारकाईने या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याशिवाय मंजूर करणार नसल्याचे सांगितले आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.
जुन्या डी.पी.आर.मध्ये काय दोष आहेत असे विचारले असता, शिरोळे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. प्रकल्प आजवर केवळ चर्चेत आहे, तो कधी पूर्ण होणार, असे विचारले असता शिरोळे यांनी आगामी वर्षात सुरू करू, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश बापट यांनी जुन्या डी.पी.आर.नुसार
मेट्रो होईल, असे सांगितल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या चर्चा केवळ वर्तमानपत्रांतून होत आहेत, असा दावा शिरोळे यांनी केला. मेट्रो भुयारी मार्गातून की रस्त्यावरून याबाबत योग्य निर्णय होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.
आमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रश्नांविषयी बापट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या प्रकल्पावर
चर्चा झाल्याशिवाय चुकीचे काही होऊ देणार नाही. एखादा महिना उशीर झाला तर तो पुणेकरांच्या हिताचाच असेल.’’(प्रतिनिधी)