दिवाळीच्या तोंडावर शिमगा सुरू ?, सामान्य झाले पुरते हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:32 AM2017-10-04T06:32:52+5:302017-10-04T06:32:55+5:30
पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. ३) जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल पुरवठा विभाग कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. ३) जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल पुरवठा विभाग कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह नागरिकांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे.
शासनाने महसूल विभागातील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अव्वल कारकून या पदावर काम करणा-या कर्मचा-यांवर अन्याय होणार असल्याचेदेखील निदर्शनास आणून दिले आहे.
या निर्णयामुळे अव्वल कारकून संवर्गातील कर्मचा-यांना पदावनत व्हावे लागणार आहे. याअनुषंगाने या पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. यानंतर संघटनेच्या मागणीबाबत कोणतीही दखल घेण्यात आली
नाही. त्यामुळे आंदोलन सुरू केल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
बारामती तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी सांगितले, की बारामती पुरवठा विभागाच्या वतीने गेल्या महिनाअखेरीस स्वस्त धान्य दुकानदारांना आॅक्टोबर महिन्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, नवीन शिधापत्रिकावाटप, शिधापत्रिकेतून नाव करणे आदी कामे प्रलंबित राहतील.
1 पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पुरवठा विभागाचे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील जवळपास २४५ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 2या संपाचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांवर शिमगा करण्याची वेळ आली, ही आमची इच्छा नाही. काम बंद ठेवण्याची मानसिकतादेखील नाही. मात्र, आमच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कित्येक वेळा चर्चा करूनदेखील मार्ग काढण्यात आलेला नाही. 3आमचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. अजूनही आमचा शासनावर भरोसा आहे. संवाद होऊन मार्ग निघण्याची अपेक्षा
आहे. लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास संघटनेचे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला.
धान्य वाटपावर होणार परिणाम
पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष केशव नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या आंदोलनाचा जिल्ह्यात धान्य वाटपावर परिणाम होणार आहे.
काही स्वस्त धान्य दुकानदार गहू, तांदूळ, साखरवाटप करू शकणार नाही. धान्य मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेत ७० ते ८० टक्के दुकानदारांना पुरवठा विभागाकडून या संपामुळे अडथळा येणार आहे. एका दुकानदाराकडे गावातील २०० ते ६०० ग्राहक असतात. वेळेत माल न मिळाल्यास या नागरिकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागणार आहे. केरोसीन वाटपावरदेखील याचा परिणाम होणार आहे.