कोरेगाव भीमा येथील गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन घेणार ड्रोन, सीसीटीव्हीची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:25 PM2018-12-15T12:25:27+5:302018-12-15T12:33:52+5:30

या काळात समाजकंटकांकडून अनुचित गोष्टींचा प्रसार केला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून समाजमाध्यमांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

Drone, CCTV assisted by district administration for the planning of the crowd in Koregaon Bhima | कोरेगाव भीमा येथील गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन घेणार ड्रोन, सीसीटीव्हीची मदत 

कोरेगाव भीमा येथील गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन घेणार ड्रोन, सीसीटीव्हीची मदत 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहितीनागरिकांना नकारात्मक बाबी आढळून आल्यास, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात२५ हून अधिक रुग्णवाहिकांची सोय करण्यात येणार

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, वाहतूक, स्वच्छतागृह अशा सर्वांची चोख व्यवस्था केली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. या काळात समाजकंटकांकडून अनुचित गोष्टींचा प्रसार केला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून समाजमाध्यमांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
कोरेगाव भीमा येथील अभिवादन दिनाला राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक बोलावली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले या वेळी उपस्थित होते.
तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यामध्ये सकारात्मक सक्षमता निर्माण करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांनी अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवनभर कार्य केले. त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. देशाला सर्वोत्तम राज्य घटना देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या विचार आणि वाणीमध्ये खूप मोठी ताकत होती. त्यांच्या विचारावर विश्वास असणारे अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम शांततेमधे पार पडेल असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला. 
येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि शौचालयांची व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्याची सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अन्न-पदार्थांच्या स्टॉलवर भेसळयुक्त पदार्थ नसतील, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, बॅरीकेट्स, वीजपुरवठा याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. तसेच, या ठिकाणी २५हून अधिक रुग्णवाहिकांची सोय करण्यात येणार आहे.
 जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात. त्यामुळे अशा शक्तींपासून सर्वांनी सावध रहायला हवे. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. नागरिकांना नकारात्मक बाबी आढळून आल्यास, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.

Web Title: Drone, CCTV assisted by district administration for the planning of the crowd in Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.