डीएसकेंना संपत्ती विक्रीचा अधिकार नाही, न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:21 AM2018-04-01T03:21:57+5:302018-04-01T03:21:57+5:30
ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे.
पुणे : ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांची संपत्ती विकून आपले पैसे मिळतील, अशी आस असलेल्या डिएसकेंच्या ठेवीदारांना आता आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. डीएसकेडीएल ही प्राईव्हेट लिमिटेड कंपनी असून तिच्या मालमत्तेची मालकी भागधारकांची असते. डीएसके वैयक्तीक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाही. असा दाव करीत याबाबत म्हणणे मांडण्यासाठी तिसरी पार्टी म्हणून न्यायालयात बाजू मांडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज एका भागधारकाने न्यायालयात केला आहे. त्यावर १२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. ठेवीदारांचे पैसे परतफेड करण्यासाठी डीएसकेडीएल कंपनीच्या मालमत्तेची विक्री करण्याबाबतची तयारी त्यांच्याकडून दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर डीएसकेडीएल कंपनीचे ३९ लाख ५० हजार रुपयांचे भागधारक असलेल्या चंदर भाटीया यांनी अॅड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी मागितली आहे.