डुप्लिकेट कोहली आणणाऱ्या सरपंचाचा जातीचा दाखलाही ठरला डुप्लिकेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:40 PM2019-05-28T16:40:08+5:302019-05-28T18:11:09+5:30
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुसरा तिसरा कोणी नाही तर डुप्लिकेट विराट कोहलीला प्रचार आणलेल्या शिरूर ग्रामीणच्या सरपंचाचा जातीचा दाखला डुप्लिकेट निघाला आहे. एवढेच नव्हे तर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याआधारे त्यांचे सरपंचपद रद्द ठरवले आहे.
पुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुसरा तिसरा कोणी नाही तर डुप्लिकेट विराट कोहलीला प्रचार आणलेल्या शिरूर ग्रामीणच्या सरपंचाचा जातीचा दाखला डुप्लिकेट निघाला आहे. एवढेच नव्हे तर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याआधारे त्यांचे सरपंचपद रद्द ठरवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण गावाचे सरपंच विठ्ठल गणपत घावटे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले आहे. त्याविरोधात संपत जाधव आणि नामदेव जाधव यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी गणपती घावटे या नावाशी साधर्म्याचा फायदा घेत कुणबी प्रमाणपत्र दाखल केल्याचे समोर आले आहे. त्यावर घावटे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत सरपंचपद रद्द ठरवले आहे.
घावटे यांनी प्रचाराच्या वेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीला प्रचारासाठी आणल्याने ते विशेष चर्चेत होते. मात्र डुप्लिकेट विराटप्रमाणे जात प्रमाणपत्रही डुप्लिकेट निघाल्याने त्यांना सरपंचपदाला मुकावे लागले आहे.