दत्तवाडी पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:41 AM2017-08-02T03:41:33+5:302017-08-02T03:41:33+5:30
नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी व तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे
पुणे : नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी व तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दत्तवाडी पोलिसांना दिले होते. मात्र, हा अहवाल मुदतीत सादर न केल्याने दत्तवाडी पोलिसांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अहवाल सादर का केला नाही याचे लेखी उत्तर १८ आॅगस्ट रोजी न्यायलयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भागीदारी संपुष्टात आल्यानंतरही ओमसाई आॅटोमोबाईल्सच्या टेÑड सर्टिफिकेटचा वापर करून दुचाकी वाहनांची विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ओमसाई आॅटोमोबाईलचा धनादेश वापरून साडेसहा लाख रुपये परस्पर स्वत:च्या खात्यात जमा केल्याप्रकरणी यापूर्वीचा एक गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तक्रारदार नितीन साहेबराव पाटील (रा. कर्वेनगर) यांनी केलेल्या खासगी तक्रारीवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दत्तवाडी पोलिसांना दिले होते. त्यानुसार, हनुमंत नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.