एकनाथ खडसेंना क्लीन चिट, भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:06 AM2018-05-02T06:06:33+5:302018-05-02T06:06:33+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. या निर्णयामुळे खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी, २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून, भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने, राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली. पुढे याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणाची पुण्यातील एसीबीकडून चौकशी सुरू होती. एसीबीने पुण्यातील न्यायालयात आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात खडसेंना क्लीन चिट देण्यात आल्याचे समजते. भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खोटे आरोप करणारे तोंडघशी पडले
दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले, याचा आनंद आहे. माझ्यावर खोटे आरोप करणारे आज तोंडघशी पडले आहेत. ही दोन वर्षे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अस्वस्थ करणारी होती. दोन वर्षांत बरेच अनुभव आले. ४० वर्षे एका विचाराने चालत होतो. मी कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे निर्दोष सुटणार, असा विश्वास होता. कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. फक्त सुपारीबहाद्दर आणि कथित समाजसेवक माझ्या राजीनाम्याची मागणी करायचे. मी नैतिक जबाबदारी म्हणून
राजीनामा
दिला होता. दरवेळी मंत्रिमंडळ विस्तार आला की, माझ्यावर आरोप केले जायचे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. दोषी असेन तर फाशी द्या, पण निर्दोष असेल, तर सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे सांगतानाच रामायणात सीतेलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते, असे खडसे यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयात दाद
मागणार - अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चिट म्हणजे भाजपा, आपल्या पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांना कशा प्रकारे वाचविते याचे उदाहरण आहे. खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे असताना, त्यांना क्लीन चिट कशी मिळू शकते, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट २०१७मध्येच मी खडसेंच्या विरोधातील सर्व पुरावे एसीबीकडे दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सर्वांनाच क्लीन चिट देत आहेत. त्यातलाच हा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित करतानाच, भाजपा सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडसे यांना एसीबीकडून क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी टिष्ट्वटरद्वारे केला आहे.