रोजगाराचे चित्र चिंताजनक : पृथ्वीराज चव्हाण; ‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’वर पुण्यात परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:18 PM2017-11-23T15:18:35+5:302017-11-23T16:30:43+5:30
राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर ते बोलत होते.
पुणे : मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दर वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षात ७० लाख रोजगार निर्माण झाले का, हा गंभीर प्रश्न आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या सर्व बाबतीत सरकारला अपयश आले आहे. राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. बुलेट ट्रेन हे आजवरचा सर्वात महागडा प्रकल्प आहे. स्मार्ट सिटी हा प्रकल्पही उथळ असून, त्याऐवजी नवीन शहरे निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले
एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांचे मौन हेच पुरेसे बोलके आहे. हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध याबाबत पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.