अभियांत्रिकी, वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया गुरूवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 08:15 PM2018-06-05T20:15:42+5:302018-06-05T20:15:42+5:30
नीट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आता प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत.
पुणे : प्रथम वर्ष वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून ( दि. ७ जुन) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरूवातीला अभ्यासक्रमनिहाय आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्दी करून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया होईल. या प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती बुधवारी (दि. ६) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल( दि. २ जून) ला तर एमबीबीएस, बीडीएस अन्य आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आता प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष सेलच्या परिपत्रकांकडे लागले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून सीईटी सेलला सोमवारीच प्रस्ताव देण्यात आला आहे. ही प्रक्रिया गुरूवार (दि. ६) पासून सुरू करण्याबाबत त्यात सुचविण्यात आले आहे.
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया दि. ७ जूनपासून सुरू होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्रची प्रक्रियाही त्यासोबत सुरू होऊ शकते. एकुण दहा कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून ही प्रक्रिया दि. ११ जूनपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सेलकडे देण्यात आला आहे. त्यावर सेलकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे येत्या आठवडाभरात या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना फार काळ वाट पाहवी लागणार नाही.
सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरूवातीला विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरून घेतले जातील. त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश निश्चित होईल. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
...............
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र व एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून (दि. ७) सुरू करण्याबाबत संबंधित विभागांना सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यासाठी त्यांचे संकेतस्थळ सुरू होतील. याबाबतची अधिसुचना बुधवारी प्रसिध्द केली जाईल. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत कृषी परिषदेने काही दिवस वेळ मागितला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होऊ शकेल. - आनंद रायते, आयुक्त