परदेशातून येणा-यांच्या माहितीची खातरजमा
By admin | Published: August 29, 2014 04:27 AM2014-08-29T04:27:06+5:302014-08-29T04:27:06+5:30
इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे
पुणे : इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे स्थानिक आरोग्य विभागांना जिकिरीचे जात असल्याची बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्याच्या आरोग्य विभाग पुणे आणि मुंबई विमानतळ प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असून, या नागरिकांच्या माहितीची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ‘इबोलाच्या भीतीने आरोग्य विभागाची घालमेल’ या वृत्ताद्वारे ही बाब लोकमतने समोर आणली होती.
गेल्या दोन आठवड्यांत ४६ नागरिक या आजाराची साथ असलेल्या देशांमधून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील आहेत. त्यातील जवळपास १५ नागरिकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक दिले असून, काही जणांचे मोबाईल पुण्यात आल्यापासून नॉट रिचेबल आहेत.
याबाबत डॉ. जगताप म्हणाल्या की, विमानतळावर आल्यावरच या नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात येते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक चुकीचा देणे ही बाब गंभीर असल्याने तसेच या साथीच्या आजाराचा धोका असल्याने हे प्रकार घडू नयेत, यासाठी लोहगाव व मुंबई विमानतळ प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक आणि दिलेला पत्ता याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांचे तिकीट त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्टवरील पत्ता या विविध माध्यमांद्वारे त्या नागरिकांना शोधणे शक्य असल्याने ही माहिती उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली जाईल, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)