स्वतःच्या अायुष्यात अंधःकार असललेले दुसऱ्यांचं घर करतायेत प्रकाशमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:09 PM2018-10-30T18:09:46+5:302018-10-30T18:15:39+5:30
येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन कारागृह प्रशासनाकडून भरविण्यात अाले असून या प्रदर्शनात दिवाळी निमित्त खास वस्तू तयार करण्यात अाल्या अाहेत.
पुणे : विविध गुन्ह्यांची शिक्षा भाेगत असलेले पुण्यातल्या येरवडा कारागृहातले कैदी दुसऱ्यांचे घर प्रकाशमान करत अाहेत. खास दिवाळी निमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात अाले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी अभिनेते नागेश भाेसले, अभिनेत्री साेनाली कुलकर्णी, कारागृह मुख्यालयाचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार अादी उपस्थित हाेते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कैद्यांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या वस्तू नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात अाल्या अाहेत.
गेल्या 10 वर्षांपासून पुण्यातल्या येरवडा कारागृहाच्या विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. अनेकदा रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडताे अाणि त्याची शिक्षा अायुष्यभर भाेगावी लागते. कैदी सुद्धा समाजाचा एक घटक अाहेत. त्यांना शिक्षा भाेगल्यानंतर समाजात मानाने जगता यावे तसेच त्यांना एक राेजगाराचे साधन निर्माण व्हावे या हेतूने कारागृहाच्या माध्यमातून कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यात गृहउपयाेगी सर्व प्रकारच्या वस्तूंचा समावेश अाहे. दिवाळी निमित्त खास कैद्यांनी अाकाश कंदिल, पणत्या, फराळाचे पदार्थ तसेच इतर वस्तू तयार केल्या अाहेत. सुबक अाणि अाकर्षक अशा या वस्तू तयार करण्यात अाल्या अाहेत.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बाेलताना मुकेश ऋषी म्हणाले, इथे येऊन या वस्तू पाहिल्यावर खूप अानंद झाला. कारागृह म्हंटलं की एक वेगळच चित्रण अापल्या डाेळ्यासमाेर तयार हाेत असतं. चुका सगळ्यांकडून हाेत असतात. परंतु या चुका सुधारण्यासाठी अापल्याला एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कैद्यांच्या अायुष्यात ती व्यक्ती म्हणजे कारागृहातील पाेलीस कर्मचारी अाहेत. कैदी ज्या वस्तू तयार करत अाहेत, जी मेहनत घेत अाहेत याची अाम्हा सर्वांनाच कदर अाहे.
नागेश भाेसले म्हणाले, हे प्रदर्शन पाहिल्यावर लक्षात अालं की कारागृहाच्या जगात सुद्धा अनेक छाेट छाेटे उद्याेग अाहेत. कारागृहात कैद्यांचं एक वेगळं जग अाहे, त्यात त्यांची मेहनत, काम अाणि कला अाहे. कैदी हा सुद्धा एक माणूस असताे. हातून एखादा गुन्हा घडताे अाणि त्याची शिक्षा त्यांना भाेगावी लागते. परंतु अाज या वस्तू पाहिल्यानंतर अापल्यातीलच ही माणसं किती प्रतिभावान अाहेत याचा प्रत्यय येताे.
साेनाली कुलकर्णी म्हणाल्या, साधारण 12 वर्षांपूर्वी मी येरवडा कारागृहामध्ये नृत्य सादरीकरण केले हाेते. अाज पुन्हा येथे येण्याची संधी मिळत अाहे. कैद्यांमधील अवगून पाेलिसांकडून मारण्यात येत अाहेत पण त्यांच्यातील गुण पाेलीस मारत नाहीत ही खूप चांगली गाेष्ट अाहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यातील गुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत अाहे.