अखेर नागराज मंजुळेंना पुणे विद्यापीठाच्या मैदानावरील सेट काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:50 AM2018-02-09T00:50:57+5:302018-02-09T08:01:55+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर अखेर चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ७ दिवसांच्या आत विद्यापीठाच्या मैदानावर लावलेला चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी दिली.
नागराज मंजुळे याला नाममात्र दरामध्ये शूटिंगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याला डिसेंबरपर्यंत मैदान वापरण्यास दिले होते, मात्र मुदत संपल्यानंतरही त्याच्या चित्रपटाचे शूटिंग झालेच नाही. त्यामुळे त्याला शूटिंग पूर्ण करण्यासाठी मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. यावर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी नियमबाह्य पद्धतीने चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाचे मैदान भाड्याने दिल्याने विद्यापीठ प्रशासनाला नोटीस देण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने मंजुळे यांना सेट काढून घेऊन मैदान रिकामे करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती डॉ. करमळकर यांनी दिली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम उपस्थित होते.
नागराज मंजुळे यांच्याकडून दिग्दर्शित केला जात असलेला चित्रपट शिक्षणाशी संबंधित असल्याने त्याला विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यातून शिक्षणाशी संबंधित जनजागृतीला मदत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले.
।पुण्यातील कलाकारांसाठी मंजुळे यांना पाठिंबा द्यावा : फुटाणे
आजकाल सेट न लावता लोकेशनवरच जास्त शूटिंग होते. पुण्यात किंवा पुणे जिल्ह्यात शूटिंग झाल्यास पुण्याच्या दुय्यम कलाकार व तंत्रज्ञांना काम मिळू शकते.
पुण्याला पुन्हा प्रभातसारखे वैभवाचे दिवस लाभू शकतात, यासाठी नागराज मंजुळे यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे आवाहन ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी केले आहे. नागराज मंजुळे यांनी फुटबॉल खेळणाºया मुलांचा विषय घेऊन पुण्यात शूटिंग सुरू केले आहे. दोन कोटी खर्चून गाव उभे केले आहे. कारण प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत. अमिताभ मध्यंतरी आजारी असल्यामुळे शूटिंग उशिरा सुरू होणार आहे, असे ते म्हणाले. चाळीस वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेने मराठी चित्रपट व्यावसायिकांची बैठक घेतली. पुण्यात चित्रनगरी सुरू करण्याचे ठरले. कात्रजच्या उद्यानात राज कपूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तेथे चित्रनगरीची कोनशिलाही बसवली. पुढे काहीच झाले नाही. १९७७ मध्ये मी या बागेत सर्वसाक्षीचे शूटिंग केले. निदान येथील भूमिपूजनाचा दगड तरी चित्रपटात दिसावा हा उद्देश होता, अशी आठवणही त्यांनी यानिमित्ताने सांगितली.
।कुलगुरूंनी
स्वीकारली जबाबदारी
नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये मैदान भाड्याने उपलब्ध करून देण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी केली जाणार का, याबाबत
डॉ. करमळकर यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटाच्या सेटसाठी मैदान उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची जबाबदारी पूर्णत: स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले.
>वेतनाबाबत नोटीस
सिंहगड एज्युकेशन सोसासटी प्राध्यापकांच्या वेतनाबाबत नोटीस देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने सोसायटीच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांसोबत बैठक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पत्रदेखील सोसायटीला पाठविले आहे. या बैठकीत वेतनाचा प्रश्न कसा सुटेल, यासाठी विद्यापीठ आग्रही असल्याचे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.
>विद्यापीठाचे जीवनसाधनागौरव पुरस्कार जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठाकडून दरवर्षी जीवनसाधनागौरव पुरस्कार दिले जातात.
यंदाच्या ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, महिला सबलीकरणाचे काम करणाºया कांचन परुळेकर, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, शिक्षणतज्ज्ञ
डॉ. प्र. ल. गावडे, प्रसिद्ध उद्योजक डॉ. नारायण मूर्ती यांना जाहीर करण्यात आले आहेत.
येत्या १० फेब्रुवारी रोजी स्वामी योग अनुसंधान संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.