चाकण एमआयडीसीत इर्टिगा कारची तीन दुचाकींना धडक, पाचही कामगार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 11:46 AM2019-05-01T11:46:58+5:302019-05-01T11:47:05+5:30
इर्टिगा कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तीन दुचाक्यांना धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन दुचाकीवरील पाच कामगार जागीच ठार झाले.
चाकण : येथील एमआयडीसीत एचपी चौक ते शिंदे वसुली चौक रस्त्यावर खालूंब्रे गावच्या हद्दीत के. एस. एच. कंपनीच्या गोडावून समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टिगा कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तीन दुचाक्यांना धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन दुचाकीवरील पाच कामगार जागीच ठार झाले. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हा अपघात झाल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांवर शोककळा पसरली आहे. आज ( १ मे ) सकाळी सव्वा सहा वाजता अपघात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळावर ( दि. ३० ) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला. चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा ( वय ३८, रा. भोसरी, पुणे ), सुनील परमानंद शर्मा ( वय ४३, रा. भोसरी, पुणे, मूळ हरियाणा ), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा ( वय २४, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे ), सत्यवान पांडे ( वय ४५, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे ) व सर्वज्ञ संजय विश्वकर्मा ( वय ३५, रा. चिखली, पुणे ) अशी अपघातात ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर वाहन चालक सुहास नामदेव शेवकरी, शेवकरी वस्ती, नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे ) जखमी झाला असून त्याच्यावर चाकण येथील कोअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत पीएसआय प्रमोद कठोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ते स्वतः या घटनेचा तपास करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पो. आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी अपघात होताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी शेवकरी हा त्याच्या ताब्यातील इर्टिगा गाडी क्रमांक ( एम एच १४ - जे एन - ३७६८ ) हि एचपी चौक ते शिंदे वासुली चौकाकडे जात असताना भरधाव वेगाने चालवून दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला व समोरून येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक ( एम एच १४ डीएल ७९६४ ), ( एम एच १४ डीई २९४२ ) व ( एम एच १४ ए जे ५१४९ ) या दुचाकींना धडक देऊन दुचाकीवरील कामगारांना ठार करून स्वतःच्या दुखापतीस व अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याने त्याच्यावर भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४(अ), ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद कठोरे हे पुढील तपास करीत आहेत.