नियम पाळणाऱ्या पुणेकरांना फुकट चहा ; येवले चहा आणि पुणे वाहतूक शाखेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 11:41 AM2018-12-15T11:41:19+5:302018-12-15T12:21:32+5:30
जागतिक चहा दिनानिमित्त पुण्यातील येवले चहा आणि वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले.
पुणे : जागतिक चहा दिनानिमित्त पुण्यातील येवले चहा आणि वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. पुण्यातील विविध चौकात हा उपक्रम राबवण्यात आला. झाशीची राणी चौकातही हा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी वाहतूक उपयुक्त तेजस्वी सातपुते, येवले चहाचे नवनाथ येवले पाेलीस कर्मचारी आदी उपस्तिथ होते.
काही माहिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्यापेक्षा जास्त कमाई करणारा येवले चहा असल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या होत्या. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने येवले यांना माेफत चहा पाेलीस कर्मचाऱ्यांना द्यायचा हाेता. परंतु पाेलीस कर्मचाऱ्यांऐवजी वाहतूकीचे नियम पाळणाऱ्यांना माेफत चहा देण्यात यावा अशी कल्पना वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी मांडली. त्यानुसार वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार नागरिकांना चहाचे कुपन देण्यात येणार आहे. हे कुपन येवले चहाच्या दुकानात दाखविण्यानंतर माेफत चहा पिता येणार आहे. या उपक्रमात वाहतूक शाखा सुद्धा सहभागी झाली. आज सकाळी झाशीची राणी चाैकात सातपुते यांनी स्वतः पाेलीस कर्मचाऱ्यांसाेबत वाहतूकीचे सर्व नियम पाळणाऱ्या नागरिकांना चहाच्या कुपनचे वाटप केले. तसेच ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
सातपुते म्हणाल्या, जागतिक चहा दिनानिमित्त येवले यांना पाेलिसांना माेफत चहा द्यायचा हाेता. त्यावेळी जे नागरिक वाहतूकीचे नियम पाळतात त्यांना चहा देण्यात यावा अशी कल्पना मी मांडली. त्यानुसार पुण्यातील विविध चाैकांमध्ये आज चहाचे कुपन वाटण्यात येणार आहे. यातून नागरिकांमध्ये नियम पाळण्याबाबत चांगला संदेश जाणार आहे. तसेच पाेलीस हे नेहमी चलान फाडतात अशी नागरिकांमध्ये समज असते. परंतु पाेलीस चांगल्या गाेष्टींना देखिल प्राेत्साहन देतात हा संदेश यातून नागरिकांमध्ये जाणार आहे.
वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार पुणेकरांना चहाच्या कुपनचे वाटप करण्यात येणार आहे. हे कूपन येवले चहाच्या कुठल्याही दुकानात येत्या 17 डिसेंबरपर्यंत दाखवून चहा पिता येणार आहे.