फ्यूजन आविष्काराची तालयात्रा
By admin | Published: December 30, 2014 12:10 AM2014-12-30T00:10:32+5:302014-12-30T00:10:32+5:30
तबल्याच्या थापेतून साकार होणारी नादब्रह्मतेची अभिजातता.. पाश्चात्त्य तालवाद्यातून व्यक्त होणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ताल.. बासरीचे मंजूळ स्वर... सतारीची झंकार...
पुणे : तबल्याच्या थापेतून साकार होणारी नादब्रह्मतेची अभिजातता.. पाश्चात्त्य तालवाद्यातून व्यक्त होणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ताल.. बासरीचे मंजूळ स्वर... सतारीची झंकार... नृत्यातून दिसलेले पदलालित्य आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या वाणीतून उमटलेले तालाचे पडघम असा ‘तालयात्रे’चा फ्यूजनात्मक प्रवास सोमवारी उलगडला आणि रसिकांना अद्वितीय आनदांची अनुभूती मिळाली.
निमित्त होते, बालगंधर्व रंगमंदिर येथे मोहिनीराज संस्थेतर्फे आयोजित ‘तालयात्रा’ या आविष्कारात्मक कार्यक्रमाचे. गायन, वादन आणि नृत्य या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या कार्यक्रमात पं. तळवलकर व शिष्यांनी लय आणि तालांचे सौंदर्य हळुवारपणे रसिकांसमोर खुलविले.
मैफलीची सुरुवात भगवान शंकरावरील दृत झपतालातील रचनेने झाली. पाश्चात्त्य तालवाद्यात गुंफलेल्या या पारंपरिक तालाचा नजराणा रसिकांना मोहून
गेला.
पाश्चात्त्य तालवाद्यांना नेहमीच नाके मुरडली जातात. पण, हीच वाद्ये पारंपरिक तालात लयबद्धतेने आणि शास्त्रीय संगीताला धरून काय आविष्कार घडवू शकतात, ‘याची देही याची डोळा’ प्रचिती संगीतप्रेमींना आली.
तीन तालातील नगमा मोहून गेला. दृत त्रितालातील खमाज रागातील पारंपरिक रचना रसिकांची दाद मिळवून गेली.
मुखातून अविटपणे उमटणारे तबल्याचे बोल... मधूनच उमटणारा बासरीचा मंजूळ स्वर... ठेक्यावर थिरकणारी पावले.. अंगावर रोमांच उभी करणारी तबल्यावरील थाप.. तबल्याच्या चाटेवरील बोलांची मोहक लयबद्धता.. आणि ड्रमसारख्या माध्यमातून आविष्कारीत होणारे ‘धा धा तिरकिट धा’सारखे बोल यातून तालयात्रा चांगलीच रंगली. कार्यक्रमाचे निवेदन राहुल सोलापूरकर यांनी केले. (प्रतिनिधी)
तालयात्रेची संकल्पना १९९४मध्ये प्रथम सादर केली. संगीतामधून राग व्यक्त होतो. त्यातील अभिजातता न सांगता कळते. तालाच्या बाबतीत हे होत नाही. ‘तालयात्रे’च्या माध्यमातून तालातील अभिजातता सांगण्याचा हा प्रयत्न आहे. गायन, वादन, नृत्य हे वेगळे नाही. ते एकच असून, ही त्याची झलक आहे.
-पं. सुरेश तळवलकर