साहित्य संमेलनात निनादणार गायकवाड बंधूंची सनई; साहित्यप्रेमींचे होणार सुरेल स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:28 PM2018-02-07T15:28:28+5:302018-02-07T15:32:23+5:30
मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सनईच्या मंजूळ सुरांनी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा होणार आहे. गायकवाड बंधूंच्या सनई आणि जलतरंगच्या सुरांनी साहित्यप्रेमींचे सुरेल स्वागत होणार आहे
पुणे : मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सनईच्या मंजूळ सुरांनी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा होणार आहे. गायकवाड बंधूंच्या सनई आणि जलतरंगच्या सुरांनी साहित्यप्रेमींचे सुरेल स्वागत होणार आहे. गायकवाड बंधूंनी यासाठी कोणताही मोबदला न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गायकवाड बंधूंची नववी पिढी सनई आणि जलतरंग वादनाची धुरा सक्षमपणे सांभाळत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीतात दुर्लभ मानल्या जाणाऱ्या जुगलबंदीचा सोहळा संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ४ या वेळात रंगणार आहे.
उदघाटन सोहळ्यातील मैफिलीत दत्तात्रय गायकवाड हे जलतरंग वादन तर धाकटे बंधू मुकूंद गायकवाड हे सनईवादन करणार आहेत. या दोहोंना सुनील गायकवाड, श्रीरंग गायकवाड (तबला) आणि आलाप गायकवाड (संबळ) साथसंगत करणार आहेत.
‘बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांनी १९०४ साली गायकवाड यांचे आजोबा पंडित वसईकर आणि वडील जी. जी. गायकवाड यांना पुण्याहून बोलावून घेतले होते. त्यांना संस्थानात दरबार कलाकार म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले होते. आजोबा आणि वडिलांचा वारसा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे नेण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे. मैफिलीत उत्स्फूर्त सादरीकरण करण्याचा विचार आहे’, अशा भावना दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केल्या.
गायकवाड बंधूंनी आजवर पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, चंद्रपूर येथील नागपूर संगीत महोत्सव, दिल्ली संगीत नाटक अकादमीतर्फे आयोजित अखिल भारतीय संगीत संमेलन, अहमदाबाद येथील पंडित ओमकारनाथ संगीत समारोह अशा विविध संगीत महोत्सवांमध्ये वादन मैफिली सादर केल्या आहेत. त्यांना उस्ताद बिस्मील्ला खाँ यांच्यासह वादनाची संधी देखील मिळाली होती. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य आणि संगीताचा मिलाफ होणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.