बारावी निकालात यंदाही मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:19 AM2018-05-31T06:19:50+5:302018-05-31T06:19:50+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. गेल्या काही वर्षांत नव्वदी ओलांडलेल्या निकालात यंदा घट झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत तो एक टक्क्याने घसरला आहे. या वेळीही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.८५ टक्के तर मुलांचे ८५.२३ टक्के आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. राज्यात ६६ हजार ४५६ पुनर्परीक्षार्थीं होते त्यापैकी २२ हजार ७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणपत्रिकेच्या मूळप्रतीचे वाटप त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ जून रोजी सकाळी ११ वाजता केले जाणार आहे. राज्यातील २,३०१ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर ५८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांच्या निकालानुसार विज्ञान शाखेतील १०, कला शाखेतील ३६, वाणिज्य शाखेतील ११ तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील एका कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
१४ जण निलंबित
बीड जिल्ह्यातील एका शाळेत उत्तरपत्रिका जळाल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी १४ जणांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर बार्शी कॉपी प्रकरणामध्ये एकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जात असल्याचे शकुंतला काळे यांनी सांगितले.
आजपासून करता येणार गुणपडताळणीसाठी अर्ज
गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी गुरुवारपासून अर्ज करता येईल. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून २०१८ या कालावधीत, तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे १९ जून २०१८ पर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळाल्यानंतर, ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
फेरपरीक्षा लवकरच : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट २०१८मध्ये होणार आहे. हा निर्णय विद्यार्थी, पालकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगाने येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व विभागीय मंडळात समुपदेशक नेमण्यात आले आहेत.